
मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी रंग फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून पुतळ्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात लाल रंग पडलेला आढळून आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मीनाताईंच्या पुतळ्यावर आणि पुतळ्याच्या पायथ्याशी लाल रंग पडलेला आढळले. यानंतर ठाकरे गटाचे अनेक शिवसैनिक तातडीने शिवाजी पार्क येथे जमा झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी तात्काळ पुतळ्याची साफसफाई सुरू केली. त्यांनी पुतळ्यावरील रंग काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
“कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजकंटक किंवा भेकडांच्या औलादीला कोणती संस्कृती, कोणते संस्कार झालेले नसतील. यांचा पोलिसांतर्फे शोध घेतला जात आहे. जे व्हायचं ते होईल, अशा प्रवृत्तींना पोलीस किंवा सरकारी यंत्रणा काय, आज तुमचे जे काही कर्तव्य आहे, ते नेमकं त्यावर काय चाललंय का, याचा निषेध करण्यापलीकडील या गोष्टी आहेत आणि त्यामुळे सरकार अपयशी ठरलं हे आपल्या प्रत्येक वेळी जाणवत आहे, असे अनिल देसाई म्हणाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुतळ्याच्या परिसरात धाव घेतली. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
जर असं झालं असेल तर त्याचा निषेधच आहे. त्यामुळे पोलीस निश्चितच याप्रकरणी गंभीर अशी दखल घेऊन याच्या मुळाशी जाऊन हे कोणी केलंय हे जनतेसमोर आणतील आणि ते आणायलाच हवं. कारण अशाप्रकारची प्रवृती एकतर विकृत मानसिकता असू शकते. किंवा यामागे काही षडयंत्र आहे का हे देखील पाहायला लागेल. याचं कोणीही समर्थन करणार नाही. आम्ही याचा निषेधच करु. मीनाताई या आदरणीय होत्या. या व्यक्तीच्या पुतळ्यावर जर अशाप्रकारे रंग फेकला जात असेल तर हे निषेधार्थ आहे आणि मी स्वत: याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.