‘मनपा सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे द्या’, खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना घरकुल योजनेअंतर्गत कार्यमस्वरूपी घरे द्यावीत, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

मनपा सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे द्या, खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 5:04 AM

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराच्या स्वच्छतेची जबाबदारी सुरळीतपणे पार पाडणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना घरकुल योजनेअंतर्गत कार्यमस्वरूपी घरे द्यावीत, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राहुल शेवाळे यांनी याविषयीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले (Shivsena MP Rahul Shewale demand permanent home for cleaning workers).

खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले, “मुंबई शहर आणि उपनगराच्या स्वच्छतेचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये करतात. यासाठी त्यांची निवासस्थाने त्यांच्या विभागालगतच्या क्षेत्रांत असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने’अंतर्गत, मुंबई शहर आणि उपनगरांमधील एकूण 46 वसाहतींमध्ये 5592 कामगारांना सेवानिवासस्थाने देण्यात आली आहेत.”

“1962 च्या वसाहतीमधील निवासस्थाने केवळ 150 चौरस फुटांची”

“या वसाहती 1962 साली उभारण्यात आल्या असून त्यांतील निवासस्थाने केवळ 150 चौरस फुटांची आहेत. आयुष्याची 30-40 वर्षे पालिकेची चाकरी करूनही या कामगारांना मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर घेता येत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना सदर निवासस्थान सोडावे लागते,” असं शेवाळे यांनी सांगितलं.

“‘घरकुल’ योजनेचा अंतर्भाव करून पालिकेच्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे द्यावी”

“अशा परिस्थितीत, पालिका कर्मचाऱ्यांना हक्काची घरं मिळवून देण्यासाठी पालिकेच्या जागांवर ‘घरकुल’ योजना राबविण्याची बाब शिवसेनेच्या वचननाम्यातही नमूद करण्यात आली होती. सध्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी आश्रय योजनेअंतर्गत कंत्रादाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया स्थायी समितीने पूर्ण केली आहे. त्यामुळे या आश्रय योजनेमध्येच ‘घरकुल’ योजनेचा अंतर्भाव करून पालिकेच्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे देऊन उर्वरित सदनिका सेवानिवासस्थाने म्हणून वापरता येतील,” अशी मागणी खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात केली.

हेही वाचा :

इयत्ता दहावी- बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोविडची लस द्या; शिवसेनेची लोकसभेत मागणी

कोरोना नियंत्रणाचं काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण द्या : खासदार राहुल शेवाळे

‘शेर की दहाड है, राहुल शेवाळे’, असं म्हणत राहुल शेवाळेंचा अनोखा प्रचार

व्हिडीओ पाहा :

Shivsena MP Rahul Shewale demand permanent home for cleaning workers