बाळासाहेबांच्या खोलीतच दोन भाऊ भेटले, काय केली चर्चा?; संजय राऊत यांच्या विधानाने कुणाला फुटला घाम?

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लाल रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सदिच्छा व्यक्त केल्या. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. याबद्दल नुकतंच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

बाळासाहेबांच्या खोलीतच दोन भाऊ भेटले, काय केली चर्चा?; संजय राऊत यांच्या विधानाने कुणाला फुटला घाम?
sanjay raut raj thackeray uddhav thackeray
| Updated on: Jul 27, 2025 | 3:03 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लाल रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सदिच्छा व्यक्त केल्या. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. याबद्दल नुकतंच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

राज ठाकरे यांनी सकाळी ११.३० वाजता ‘शिवतीर्थ’हून निघत दुपारी १२ वाजता ‘मातोश्री’ गाठले. राज ठाकरे आल्याचे समजताच उद्धव ठाकरे स्वत: त्यांचे स्वागत करण्यासाठी बाहेर आले. यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. यासोबतच राज ठाकरे यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या फोनवरुन संजय राऊतांना फोन केला. त्यावेळी त्यांनी मी मातोश्रीवर येत आहे, असा निरोप दिला. संजय राऊतांनी हा निरोप उद्धव ठाकरेंना दिला. यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

गुलाबाचे पुष्पगुच्छ देत वाढदिवसानिमित्त सदिच्छा

यानंतर काही मिनिटातच राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानावरुन मातोश्रीवर पोहोचले. या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकमेकांना अलिंगन दिले. गुलाबाचे पुष्पगुच्छ देत वाढदिवसानिमित्त सदिच्छा दिल्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मातोश्रीत गेल्यानंतर आत बरंच काही घडलं. दोन भाऊ भेटले. एकमेकांना प्रेमाचं आलिंगन दिलं. गप्पा झाल्या. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत व्यंगचित्रांवर चर्चा झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बऱ्याच चर्चा झाल्या, दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाहीत. दोन भाऊ आहेत. भेटणं गरजेचं आहे. भेटले. आले. नातं दृढ होत आहे. होतंच. आम्हाला त्याचा आनंद आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

यावेळी संजय राऊत यांना राजकीय युतीबद्दल विचारले असता त्यांनी सूचकपणे प्रतिक्रिया दिली, “जे होईल ते चांगलंच होईल” असे म्हटले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.