मतदार यादीत तुमचं नाव आहे का? वय, धर्म, लिंग बदललं का? एका झटक्यात तपासा; उद्धव ठाकरेंचा महत्त्वाचा सल्ला

सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. मनसे आणि महाविकास आघाडीने मतदार याद्यांमधील तफावत आणि बोगस मतदारांविरोधात आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली आहे

मतदार यादीत तुमचं नाव आहे का? वय, धर्म, लिंग बदललं का? एका झटक्यात तपासा; उद्धव ठाकरेंचा महत्त्वाचा सल्ला
| Updated on: Nov 03, 2025 | 1:17 PM

सध्या महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता मनसे आणि महाविकासआघाडीकडून मतचोरीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरले जात आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे आणि महाविकासआघाडीने मतदार याद्यांमधील तफावत आणि बोगस मतदार यांच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्यासोबतच त्यांनी राज्यातील मतदारांना एक मोठे आवाहन केले आहे.

या मोर्चानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. एका-एका घरात ४० ते ५० नावं ही नोंदली गेली आहेत. ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे, अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. फक्त माझं नाव वगळलं म्हणून निवडणूक आयोगाने चौकशी केली. पण सर्वसामान्यांनी दाद कधी मागायची? जर नाव वगळलं तर मतदान करता येणार नाही,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आमच्या शाखेत येऊन मतदार यादी तपासा

परवा मतचोरीच्या मुद्द्यावरुन एकत्र सर्वपक्षीयांचा मोर्चा झाला. त्यावेळी सर्वांनी सरकारला जाब विचारला. आता आम्ही मतदारांची ओळख केंद्र हे प्रत्येक शाखा शाखांमध्ये सुरु करणार आहोत. त्यानंतर पुढच्या आठवड्याभरात आक्षेप आणि काही सूचना या स्वीकारल्या जातील. आता जर कोणी झोपलं तर तो संपला. याच्या मागे कोण काय याची खातरजमा कोणी तरी करायला हवी. आम्ही आमच्या शाखांमध्ये मतदारांची केंद्रे उघडतो आहोत. या केंद्रात मी नागरिकांनी यावे, त्यांनी त्यांची नाव आहेत की नाही, हे आमच्या शाखेत येऊन तपासा. जर तुम्हाला यात काही गोंधळ वाटला तर लगेचच सांगा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

एका-एका घरात ४० ते ५० नावं, ही निवडणूक आयोगाची भुताटकी

ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे. एका-एका घरात ४० ते ५० नावं ही नोंदली गेली आहे. तर मी मतदारांना आवाहन करतो की आपल्याला न दिसणारी, आपल्या परवानगीशिवाय न राहणारी, आपल्या परवानगीने राहणारी माणसं आहेत का, ही निवडणूक आयोगाची उभी केलेली भूत आपल्या घरात राहत तर नाही ना, याची चौकशी केंद्रात करावी. सर्व जात पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन मतदार यादीच चौकशी करावी. तुमचं नाव वगळलं का, वय किती आहे, लिंग बदललं का, धर्म बदललं का, हे सर्व येऊन तपासावं, असं मी आवाहन करतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.