“रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातील आसू…” उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

"वांद्र्यात गद्दाराचा मेळावा सुरू आहे. राजकारणातील बाटगे आहेत. गद्दारांना सांगतो तुम्ही करता काय. आज कदाचित तुम्ही जिंकला असं वाटत असेल. आज आम्ही हरलोत तरी जनता आमचं स्वागत करत आहे", असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातील आसू... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
| Updated on: Jan 23, 2025 | 11:18 PM

शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले की आपल्या दरेगावी भेट देतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. एकनाथ शिंदे हे दरेगावात जाऊन अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त करतात, असेही बोललं जाते. गेल्या काही महिन्यांपासून दोन ते तीन वेळा एकनाथ शिंदे हे दरेगावात गेले आहेत. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता या मुद्द्यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. ते मुंबईतील अंधेरीत आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते.

“शिवसैनिक अस्वस्थ रुग्णाला जातपात न पाहता रक्तदान करतील, पण आरएसएस…”

“पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या भाजपचं वेगळं असतं. बाहेरच्या राज्यातून ९० हजार आणले. काही म्हणतात ते संघाचे लोक होते. आता ते ९० हजार कुठे गेले. ते संघाचे कार्यकर्ते असतील तर आता धावून येतील? मुलांना शाळेत प्रवेश हवा, रक्त हवे हे आरएसएसवाले देतील. ९० हजार जे उपरे आले ते रक्तदान करेल की गोमूत्र दान करेल. ते करू शकतात. शिवसैनिक अस्वस्थ रुग्णाला जातपात न पाहता रक्तदान करतील. पण संघाचे लोक असतील तर म्हणतील रक्त नव्हे आम्ही गोमूत्र देतो. मद्रास आयआयटीचे संचालक कामकोटी म्हणाले, तापाने फणफणत होते तेव्हा गोमूत्र पिऊन बरे झाले. धन्य आहेत. अशी माणसं शिकतात कशी. शिकतात काय?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

“अडचणीची जागा असून सर्व निष्ठांवत आले”

“एवढे मुंबईकर निष्ठूर होऊ शकत नाही. मावळा कधीच शिवसेनेशी गद्दारी करू शकत नाही. दरवेळी आपण शहरात सभा घेतो. यावेळी उपनगरमध्ये घेतली. येण्याजाण्याची गैरसोय होते. अडचणीची जागा असून सर्व निष्ठांवत आले. तुम्हाला धन्यवाद देतो. मी तुमच्या ताकदीवरच लढत आहे. वांद्र्यात गद्दाराचा मेळावा सुरू आहे. राजकारणातील बाटगे आहेत. गद्दारांना सांगतो तुम्ही करता काय. आज कदाचित तुम्ही जिंकला असं वाटत असेल. आज आम्ही हरलोत तरी जनता आमचं स्वागत करत आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“…नाही तर गावाला निघून जा”

“गद्दार जिंकले असतील त्यांना जिंकवणारे अमित शाह आहे. यंत्रणा बेकायदेशीर वापरल्या. अमित शाह आहेत तोपर्यंत तुम्ही आहात. महापालिका होऊ द्या, तुमची काय वाट लागते ते पाहा. अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून वागणूक मिळत होती. आता बसायचे तर बसा नाही तर गावाला निघून जा. मंत्रीपद नाही मिळालं गेले गावी. दावोसला नेले नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू, गावात जाऊन बसू. डोळ्यातले आसू दिसू लागलेत”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

“विधानसभेत आपण गाफिल राहिलो, त्याचा गैरफायदा घेतला”

“विधानसभेत आपण गाफिल राहिलो. त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. त्या काळात त्यांना अपप्रचार केला. आपण हिंदुत्व सोडलं नाही. मला सांगा हिंदुत्व सोडलं असेल तर. मी चेंबूरच्या चिता कॅम्पमध्ये भाषण केलं. तिथे मुस्लिम होते. मी हिंदीत भाषण केलं. त्यांना म्हटलं मी हिंदुत्व सोडलं का. माझं हिंदुत्व मान्य आहे का. तर ते हो म्हणाले”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.