इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला; सहा वर्षीय चिमुकलीचा अंत

| Updated on: Oct 16, 2019 | 8:21 AM

इमारतीच्या चौथ्या माजल्याच्या गॅलरीचा स्लॅब कोसळून एका सहा वर्षीय चिमुकलीचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना विरार परिसरात घडली (Virar Gallery Slab Collapsed). विरार पूर्व कोपरी परिसरातील नित्यानंद धाम-सी या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला, यामध्ये तिसऱ्या मजल्यावर गॅलरीत खेळणाऱ्या सहा वर्षीय भूमी विनोद पाटीलचा मृत्यू झाला

इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला; सहा वर्षीय चिमुकलीचा अंत
Follow us on

मुंबई : इमारतीच्या चौथ्या माजल्याच्या गॅलरीचा स्लॅब कोसळून एका सहा वर्षीय चिमुकलीचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना विरार परिसरात घडली (Virar Gallery Slab Collapsed). विरार पूर्व कोपरी परिसरातील नित्यानंद धाम-सी या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला, यामध्ये तिसऱ्या मजल्यावर गॅलरीत खेळणाऱ्या सहा वर्षीय भूमी विनोद पाटीलचा मृत्यू झाला (Virar Gallery Slab Collapsed). या घटनेनंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत इमारतीतील 80 च्यावर कुटुंबांना सुखरुप बाहेर काढलं.

विरार पूर्व कोपरी परिसरात 15 ते 20 वर्षांपुर्वीची नित्यानंद धाम-सी ही चार मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये 80 च्यावर कुटुंब वास्तव्यास आहेत. या इमारतीचा काही भाग धोकादायक स्थितीत होता. अखेर मंळवारी (15 ऑक्टोबर) सायंकाळी साडे सातच्या सुमारास अचानक या इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला. काही कळण्याच्या आत ही दुर्घटना घडल्याने इमारतीतील नागरिक भयभीत झाले होते. मात्र, स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत इमारतीत अडकलेल्या कुटुंबांना बाहेर काढण्यात यश मिळविलं.

या दुर्घटनेत तिसऱ्या मजल्यावर खेळणाऱ्या सहा वर्षीय भूमी विनोद पाटील हिच्या अंगावर गॅलरीचा स्लॅब कोसळला. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. वसई-विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तासानंतर कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली अडकलेला भूमीचा मृतदेह शोधून काढला. भूमीच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.