स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नातवाचा सर्वात मोठा निर्णय, थेट सोनिया गांधी यांना…
सोनिया गांधींच्या 'बिलॉन्गिंग' पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या उल्लेखावरून वाद निर्माण झाला आहे. शिंदे सेनेने निषेध करत पुस्तक फाडले. आता सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी सोनिया गांधींवर मानहानीचा खटला भरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींप्रमाणेच सोनिया गांधींनाही कोर्टात खेचणार असल्याचा इशारा सात्यकी सावरकर यांनी दिला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्यात आल्याचा दावा करत शिंदे सेनेच्या नेत्यांनी या पुस्तकाचा निषेध नोंदवला आहे. तसेच शिंदे सेनेने सोनिया गांधी यांचं हे पुस्तक फाडत त्यावर तीव्र प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. त्यामुळे हे पुस्तक वादात सापडलं आहे. आता या वादात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी उडी घेतली आहे. या प्रकरणात सोनिया गांधी यांना थेट कोर्टात खेचणार असल्याचा मोठा निर्णयच सात्यकी सावरकर यांनी घेतला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. मी दोन दिवस कर्नाटकात होतो. युवा ब्रिगेडने सावरकरांच्या संदर्भातील एक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मी तिकडे व्यस्त होतो. मला सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील उल्लेखाबद्दल समजले आहे. या पुस्तकात सावरकर यांच्यावर काही उल्लेख करण्यात आला आहे. मी पुस्तक वाचलं नाही. पण यापूर्वी राहुल गांधी यांनी देखील सावरकरांवर तथ्यहीन आणि संदर्भहीन भाष्य केलं होतं. त्यांच्यावर मी मानहानीचा दावा ठोकला होता. त्यात त्यांना कोर्टाने दणका दिला आहे. अशा परिस्थितीत मला सोनिया गांधी यांचं पुस्तक वाचताना असं काही आढळलं आणि सोनिया गांधी यांनी देखील सावरकरांबद्दल तथ्यहीन आरोप केले तर मी निश्चित कायदेशीर सल्ला घेणार आहे. सोनिया गांधींनाही मी कोर्टात खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराच सात्यकी सावरकर यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी त्यावर बोलावं
दरम्यान, या पुस्तकावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोनिया गांधींनी त्यांच्या पुस्तकात दांभिकपणे लिखाण केलं आहे. सोनिया गांधींनी त्यांच्या पुस्तकात सावरकराबाबत जे लिहलंय, त्यावर उद्धव ठाकरेंनी सामनामधून बोललं पाहिजे, असं आव्हानच नीलम गोऱ्हे यांनी दिलं आहे. तर, सोनिया गांधी यांच्या पुस्तकात सावरकरांबद्दल काही असेल तर आम्ही त्यावर निश्चित बोलू. आमची सावरकरांबाबतची भूमिका बदललेली नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मी पुस्तक पाहिले नाही, मला ते वाचायचेही नाही. त्यांना काही गोष्टी आक्षेपार्ह वाटल्या असतील, तर त्यांचा तो अधिकार आहे, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे.
शायना एनसी विरोधात आक्रोश
दरम्यान, शिंदे सेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. त्यामुळे शिवसैनिक संतापले आहेत. ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून शायना एनसी विरोधात आक्रोश करायला सुरुवात केली आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूरमधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आक्रमक झाले असून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी शायना एनसी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. माहूर पोलिसांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसैनिकांनी शिवसेना शिंदे गट आणि प्रवक्त्या शायना एनसी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
माफी मागा
बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो फाडल्याच्या प्रकरणात शायना एनसी यांची जाहीर माफी मागावी. त्याच्या कृतीमुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. बाळासाहेबांवरील प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे बाळासाहेबांशी माझे ऋणानुबंध आहेत, असं सुशीबेन शाह म्हणाल्या.