फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी
बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो फाडणारे अमित शाह यांच्या विचाराचे हे वाहक आहेत. अमित शाह यांनाच बाळासाहेबांवर श्रद्धा नाही. बाळासाहेबांचे फोटो कशाला आणले? माफी मागून प्रश्न सुटणार आहे का? एकनाथ शिंदे यांनी काय कारवाई केली ते सांगा? फोटो फाडल्यावर का सारवासारव का करत होते? तेव्हाच माफी का मागितली नाही? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष होते. राष्ट्रपुरुषांचा अपमान करणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे शायना एनसी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. माफी वगैरे काही नाही. त्यांनी जाणूनबुजून बाळासाहेबांचा अपमान केला आहे. फोटो फाडायचा नव्हता तर आणलाच कशाला? तो फोटो फाडण्यासाठी आणला होता. फोटो फाडल्यावर हे लोक कौरवाप्रमाणे विकट हास्य करत होते, असा घणाघाती हल्लाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी बोलताना राऊत यांनी हा हल्लाबोल केला आहे.
बाळासाहेबांचा अपमान झाला आहे. त्यांनी कितीही माफी मागितली तरी आंदोलनं सुरूच राहील. माफी ही पळवाट झाली. शिवसेनाप्रमुखांचा फोटो फाडला जात असताना त्या पाच सहा जणांच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य होतं. जणू काही ठरवून फोटो फाडला जात होता. बाळासाहेबांचं नाव देऊन बनवलेल्या भवनात ठरवून फोटो फाडत होते. दुर्योधनाच्या दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना कौरव जसे विकट हास्य करत होते, त्या विकट हास्याचे भाव त्या पाच जणांच्या चेहऱ्यावर दिसत होते. ते सर्व कधीकाळी आमच्या शिवसेनेतील लाभार्थी होते. शिवसेनेसाठी त्यांचं काही योगदान नव्हतं, तरीही ते लाभार्थी होते. तो फोटो फाडण्यासाठीच आणला होता. पुस्तक फाडायचं होतं. मग फोटो का आणला? कशासाठी आणला? आणायची गरज नव्हती, असं संजय राऊत म्हणाले.
शिंदेंनी काय कारवाई केली?
मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडायचा होता म्हणे. मणिशंकर अय्यर यांचा फोटो कशाला फाडता? पुस्तक फाडायचं होतं ना? तुम्हाला फोटोच फाडायचा होता तर मणिशंकर अय्यर यांचा स्वतंत्र फोटो आणायचा होता. पण तुम्हाला जाणूनबुजून बाळासाहेबांचा अपमान करायचा होता. त्यांना बाळसााहेबांच्या विचाराशी घेणंदेणं नव्हतं. सत्तेसाठी, सत्तेच्या तुकड्यासाठी उड्या मारणारे हे लोक आहेत. त्यांची मानसिकता आणि उबळ दिसून आली. या लोकांवर एकनाथ शिंदे यांनी कारवाई काय केली? त्यांनी काय कारवाई केली? बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत म्हणता ना? मग बाळासाहेबांचा फोटो तुमच्या पक्षाच्या कार्यालयात फाडला जातो, आणि विकट हास्य केलं जातं, गांधारी आणि शकुनी प्रमाणे. तुम्ही कारवाई काय केली? त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
गुन्हा दाखल करा
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष आहेत. तर राष्ट्रपुरुषाच्या अवमानाबद्दल कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करणार आहात? या कलमाखाली तीन वर्षाची शिक्षा आहे. पोलीस आयुक्तांना आवाहन आहे. त्यांनी गुन्हा दाखल करून घ्यावा, अशी मागणी करतानाच फक्त मोदींचाच अवमान झाल्यावर गुन्हा दाखल होतो का? न्याय संहितेत एकच न्याय आहे का? बाळासाहेबांचा अपमान होतो तेव्हा गुन्हा दाखल करायचे नाही का? असे सवाल राऊत यांनी केले.
सावरकरांवर नंतर बोलू
वीर सावरकरांच्या विचाराशी त्या पाच जणांचा काडीमात्र संबंध नाही. सावरकरांच्या विषयावर नंतर बोलू. शिंदेंनी विषय भरकटवू नये. आम्ही बघू. आम्ही सावरकरांवर भूमिका घेत आलो आहोत, त्यात बदल नाही. सोनिया गांधींच्या पुस्तकात आक्षेपार्ह असेल तर आम्ही त्यावर बोलू. पण तुम्ही बाळासाहेबांचा फोटो नेलाच कशाला? फाडायलाच नेला ना? या बाईला राज्यसभेवर पाठवणार होते. हे यांचे शिलेदार आहेत. त्यांना बाळासाहेबांवर किंचित श्रद्धा आणि आस्था नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.
