राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत विरोधकांचे ही लाव रे तो व्हिडिओ
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडीओ म्हणत सुषमा अंधारे यांचा व्हिडीओ सभेत दाखवून उद्दव ठाकरेंना सवाल केला. त्यावर विरोधकांनीही राज ठाकरेंच्या जुन्या भूमिकेचे व्हिडीओ दाखवून त्यांना उत्तर दिलं आहे.

२०१९ ज्या लाव रे तो व्हिडीओंवरुन राज ठाकरे देशभर चर्चेत राहिले. त्याच स्टाईलनं यंदा राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचा व्हिडीओ कालच्या सभेत लावला. मात्र त्याला विरोधकांनी व्हिडीओनींच उत्तर दिलंय. याआधी बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्या अंधारेंना ठाकरेंनी प्रवक्ता कसं केलं, असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय. तर ज्या राणे कुटुंबियांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल विधानं केली. तुम्ही त्यांच्याच प्रचाराला कसा गेलात असा प्रतिप्रश्न ठाकरे गटानं केलाय.
काल ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंनी अंधारेंचा व्हिडीओ दाखवला. आणि दुसरीकडे कल्याणमध्ये फडणवीस राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते. तो व्हिडीओ जयंत पाटलांनी ऐकवला. काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीका करणारे राज ठाकरे पुण्यात जावून त्यांचंच कौतुक कसं करतात. म्हणून सवाल विचारले जातायत. शिवाय शरद पवारांसोबत राहून अजित पवारांनी जातीयवाद केला नाही. या राज ठाकरेंच्या दाव्यावर अजित पवार गटाची आत्ताची आणि आधीची भूमिकाही चर्चेत आहे.
2019 ला देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंसह मित्रपक्षांचे नेते राज ठाकरे सुपारी घेवून भाषण करत असल्याचा आरोप करत होते. आणि यंदा तेच आरोप काँग्रेस-शरद पवार आणि ठाकरे गटाकडून होत आहेत. कालच्या सभेत बाळासाहेबांच्या अटकेचा आदेश काढणाऱ्या भुजबळांसोबत सत्तेत कसे बसलात. असा प्रश्न राज ठाकरेंनी केला. मात्र सध्या भुजबळ शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत असल्यानं सत्ताधाऱ्यांना यावर सारवासारव करावी लागली.
यंदाच्या निवडणुकीत आघाडी असो वा महायुती मतं आणि भूमिकांचं रंजक चित्र आहे. कालच फडणवीस एका मुलाखतीत म्हटले की राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मुद्यावर स्थीरावले आहेत. पण राज ठाकरेंनी कालच्याच सभेत पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा छेडला.
फडणवीस म्हणाले की मोदींनी केलेला विकास हा महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकांचा मुद्दा आहे. राज ठाकरे काल म्हटले की मी पहिल्यांदा एकही मुद्दा नसलेली निवडणूक अनुभवतोय.
धनंजय मुंडे बारातमीत येवून भावनिक राजकारणाला बळी न पडण्याचं आवाहन करतात. दुसरीकडे त्यांच्याच बीडमध्ये उदयनराजे आणि स्वतः पंकजा मुंडेंकडून भावनिक आवाहन केलं जातं.
पंकजा मुंडे म्हणतात की आपल्याला पंतप्रधान मोदींनी उमेदवारी दिली. आणि अजित पवार पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदासाठी मोदींना शिफारस करणार म्हणून सांगतायत.
बीडमध्ये महायुतीचे नेते म्हणतात की विद्यमान सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस नेला. तिकडे सोलापुरात भाजपचे उमेदवार राम सातपुते मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटेपर्यंत पेठा न घालण्याची प्रतिज्ञा करतात.
आपण मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा दिलाय. मात्र तो पाठिंबा बाहेरुन असल्यानं आपण बोलू शकतो. असं राज ठाकरे काल म्हणाले. पण इतरांची पोरं कडेवर घेणार नसल्याच्या भूमिकेनंतर काही दिवसांनीच राज ठाकरेंनी महायुतीचा प्रचार केल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर विरोधक प्रश्न करतायत.
2019 ते 2024 या पाच वर्षांच्या काळात राज ठाकरेंनी पाठिंब्याची भूमिका बदललीय. मात्र त्यांच्यावरची टीका मात्र कायम आहे. फक्त 2019 ला जे महायुतीचे नेते बोलत होते., तेच 2024 ला मविआचे नेते बोलत आहेत.
