7 दिवसांपासून बँकेचे कामकाज ठप्प, एसटी बँकेचे राज्यभरातील कर्मचारी मुंबईत, मोठ्या हालचाली

| Updated on: Sep 11, 2023 | 6:22 PM

एसटी बँकेचे कर्मचारी संचालक मंडळाविरोधात आक्रमक झाले आहेत. गेल्या सात दिवसांपासून एसटी बँकेचे कामकाज ठप्प झालंय. त्यामुळे कर्मचारी आता मुंबईतील मुख्यालयाबाहेर दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांसोबत शिवसेनेचे नेते आनंद अडसूळ हे देखील आहेत.

7 दिवसांपासून बँकेचे कामकाज ठप्प, एसटी बँकेचे राज्यभरातील कर्मचारी मुंबईत, मोठ्या हालचाली
Follow us on

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेचे (एसटी बँक) कर्मचारी मुंबई सेंट्रलच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून एसटी बँकेचे कर्मचारी मुंबई सेंट्रल येथील मुख्य कार्यालयात दाखल झाले आहेत. एसटी बँक कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळविरोधात आक्रमक झाले आहेत. संबंधित घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केलाय. सदावर्तेंच्या पॅनलच्या संचालक मंडळाने आर्थिक घडामोडींसंदर्भात चुकीचे निर्णय घेतल्याने बँक डबघाईस येत असल्याचा आरोप शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केलाय.

मागील 7 दिवसांपासून स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेचे कामकाज ठप्प आहे. विशेष म्हणजे आनंदराव अडसूळ हे देखील बँकेबाहेर पोहोचले आहेत. पोलिसांकडून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. आनंदराव अडसूळ यांनी याप्रकरणी निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मनमानीमुळे एसटी बँक डबघाईला गेली, असा त्यांचा आरोप आहे. तसेच आपण अखेरपर्यंत हा लढा देणार, माघार घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

नेमकं काय घडतंय?

एसटी बँक कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळाविरोधात आक्रमक झाले आहेत. एसटी बँकेचे कर्मचारी मुंबई सेंट्रलच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी बँकेचे कर्मचारी मुंबईत आले आहेत. गेल्या सात दिवसांपासून एसटी बँकेचं कामकाज ठप्प झालंय. संबंधित घटनेच्या पार्श्वभूमीवर डीसीपी अकबर पठान यांच्या मध्यस्तीनंतर पाच आंदोलनकर्ते संचालक मंडळास जाब विचारण्यासाठी बँकेच्या आत पोहोचले आहेत. तर आनंदराव अडसूळ यांनी बँकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडलाय.

“आम्ही रस्त्यावर आलो आहोत. पोलीस आपला अधिकार वापरत आहेत. आमचा संयम सुटला तर आणखी काही होईल. आमची लाठी-काठी खाण्याची तयारी आहे. त्यांनी सांगितलं गोळीबार करायची, गोळीबार करा, तर आमची तयारी आहे”, अशी प्रतिक्रिया आनंदराव अडसूळ यांनी दिलीय.

“प्रकरण चिघळलंच आहे. त्यांना त्याची लाज-शरम नाही. सात दिवस बँक बंद आहे याची लाज नाही. बँकेचे व्यवहार बंद होणं हे किती घातक आहे. हे व्यवहार त्यांच्या चुकीच्या व्यवहारामुळे बंद पडले आहेत. कायद्याची पायमल्ली करायची. वकील आहे की आणखी कोण तेच कळत नाही. त्यांना कायदा कळत नाही. बँकेचे नियम माहिती नाही. त्यांना माणुसकी नाही”, अशी टीका आनंदराव अडसूळ यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केली.