सुनेत्रा पवारांनी बारामतीची निवडणूक जिंकताच सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला. 21 पैकी 21 जागा जिंकल्याने राष्ट्रवादीत जल्लोष आहे. यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "अजितदादांनी ग्रामीण भागात घट्ट पकड निर्माण केली होती, ती आजही कायम आहे."

सुनेत्रा पवारांनी बारामतीची निवडणूक जिंकताच सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
sunil tatkare
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 2:27 PM

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काल पार पडली. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील पॅनलने 21 पैकी 21 जागा जिंकल्या आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या नंतर सुनेत्रा पवार यांनी मिळवलेला हा पहिला मोठा विजय आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत जल्लोषाचं वातावरण आहे. या निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादांनी ग्रामीण भागात पकड घट्ट केली होती. तीच पकड आजही कायम आहे, असं सुनील तटकरे मीडियाशी संवाद साधताना म्हणाले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 पैकी 21 उमेदवार निवडून आले आहेत. वहिनींच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली. दादांनी ग्रामीण भागात पकड मजबूत केली होती. तीच पकड कायम आहे, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

Loading...

सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे कालच्या बैठकीला गैरहजर होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वहिनी काल बारामतीमध्ये होत्या. एकनाथ शिंदे हे कामात व्यस्त असतील. त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना न्याय दिला जाणार आहे, असं तटकरे म्हणाले.

तेव्हा ईव्हीएम योग्य, नंतर मात्र…

यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर विरोधकांनी काढलेल्या मोर्चावर टीका केली. काही मतभेद असू शकतात. वेगळे विचार असू शकतात. याचा अर्थ स्वायत्त संस्थेबाबत वेगळ्या पद्धतीने प्रश्न निर्माण करणं योग्य नाही. 2004मध्ये ईव्हीएम आले. तेव्हा यूपीएचं सरकार आलं. 2009च्या निवडणुकाही ईव्हीएमद्वारे झाल्या. तेव्हाही मनमोहन सिंग यांचं सरकार आलं. तेव्हा ईव्हीएम योग्य होत्या आणि 2014 पासून एनडीएने देशभरात बहुमत मिळवलं, तेव्हा मात्र ईव्हीएमवर प्रश्न केल्या गेले, हे योग्य नाही, असं तटकरे म्हणाले.

या देशात लोकशाही व्यवस्था घटनेने दिली आहे. त्यात कायदे व्यवस्था, कायदे निर्माण करण्याचं काम संसद किंवा विधानसभा करते. न्याय व्यवस्था ही स्वतंत्र व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेचाही काही वेळा अंकूश असतो. अशावेळी मोर्चा काढणं योग्य नाही. सीजेआयची भेट मागणं हे मी पहिल्यांदाच ऐकतो. तुम्ही कोर्टात याचिका दाखल करू शकता, न्याय मागू शकता. भेटी मागणं नेमकं काय आहे? हे मलाही कळत नाही. मीही लोकसभा आणि विधानसभेत अनेक वर्षापासून काम केलं. पण अशी मागणी मी पहिल्यांदाच अनुभवत आहे, अशी टीका त्यांनी केली.

पराजयाचं खापर दुसऱ्यावर…

2024मध्ये महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. महायुतीला 17 जागा मिळाल्या. म्हणजे मोठ्या फरकाने महाविकास आघाडीला यश मिळालं. तेव्हा ईव्हीएमला कोणी दोष दिला नाही. मतदार यादीत नावं चुकीची होती, असं म्हटलं नाही. विधानसभेत महायुतीला यश मिळाल्यावर टीका सुरू झाली. चार महिन्यात असा काय बदल झाला? यादी तीच होती. मशीन तीच होती. पण पराजयाचं खापर दुसऱ्यावर फोडायचं आणि विजयाचं श्रेय स्वत: घ्यायची ही भूमिका योग्य वाटत नाही, असा हल्ला त्यांनी चढवला.

फंडिंगबाबत मला माहीत नाही

सीजेपीला परदेशातून फंडिंग होत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. मला त्याबाबत माहीत नाही. केंद्र सरकार त्याबाबत माहिती घेऊ शकतं. देशाच्या बाहेरील शक्तीकडून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असेल तर देशाला योग्य राहणार नाही. पण फंडिंगबाबत मला काही माहीत नाही. कुणी आरोप केले माहीत नाही. पण केंद्र सरकार योग्य भूमिका घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

एनडीएला बदनाम करण्याचे जेवढे प्रयत्न असतील तेवढे विरोधक करतील. प्रत्येकाला आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. आपल्या देशाची लोकशाही प्रगल्भ आहे. अनेक सरकार आले आणि गेले. विरोधी पक्षाची भूमिका विरोधक ठरवत असतात. त्यांना काय करायचं ते करू द्या, असं खासदार सुनील तटकरे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us