मोठा उलटफेर? अमित शाह यांच्या मतदारसंघातील पालिका निवडणुकीचे धक्कादायक निकाल; कुणाला टेन्शन?
गांधीनगर महापालिका निवडणुकीचे निकाल अमित शाह यांच्या मतदारसंघात धक्कादायक ठरत आहेत. भाजपने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली असून, काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आपने मैदानात उतरल्याने काँग्रेसची मते विभागली जात असल्याने भाजपला फायदा होत असल्याचे चित्र आहे. भाजपने दोन जागा जिंकल्या असून, सर्व ४४ जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील महापालिका निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या निकालात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. आतापर्यंत भाजपने या निवडणुकीत 2 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीतील 44 पैकी 44 जागा जिंकण्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल काय लागणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज दुपारपर्यंत या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेससाठी हे निकाल धक्कादायक राहणार असल्याचं तरी चित्र दिसत आहे. तसेच या निवडणुकीत मोठा उलटफेर होईल असं सांगितलं जात होतं. पण तसं होताना दिसत नाहीये.
गांधी नगर महापालिकेच्या 11 वॉर्डातील 44 जागांची मोजणी सुरू आहे. सुरुवातीलाच भाजपने विजयी खातं उघडलं आहे. वॉर्ड क्रमांक 5 आणि 7 मध्ये भाजपने विजय मिळवला आहे. या दोन्ही वॉर्डात भाजपच्या 4-4 उमेदवारांच्या संपूर्ण पॅनलचा विजय झाला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने 44 पैकी 41 जागांवर विजय मिळवला होता. यावेळीही भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसने भाजपच्या सत्तेवरच सवाल केला आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. मात्र, निवडणुकीच्या कलानुसार काँग्रेसला या निडवणुकीत मोठा धक्का बसताना दिसत आहे.
आपची डोकेदुखी
गांधीनगर महापालिका निवडणुकीत एकूण 130 उमेदवार मैदानात आहेत. यात भाजप आणि काँग्रेसचे 44-44 उमेदवार आहेत. तर आम आदमी पार्टीने 32 उमेदवार मैदानात उतरवले आहेत. इतर पक्षही या निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. आम आदमी पार्टीने ही निवडणूक स्वबळावर लढली. त्यामुळे काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार काँग्रेसचीच मते खाणार असल्याने त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
भाजपसमोर आव्हान
गांधी नगर महापालिकेत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असली तरी आपच्या एन्ट्रीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भाजपला फायदाच होणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच आम्ही यावेळी सर्वच्या सर्व 44 जागा जिंकत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपने दोन जागांवर विजय मिळवल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. मागच्या महापालिका निवडणुकीत भाजपने 44 पैकी 41 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला अवघ्या दोनच जागांवर विजय मिळवता आला होता. तर, आम आदमी पार्टीने एका जागेवर विजय मिळवला होता. यावेळी भाजपसमोर गेल्यावेळ पेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आहे.
