Supriya Sule: NDA मध्ये राष्ट्रवादी सामील होणार? राजकीय चर्चांवर सुप्रिया सुळेंचे सर्वात मोठे वक्तव्य… विलिनीकरणावरही मोठी भूमिका

Supriya Sule On NDA: शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या तीन चार दिवसात काहूर उठवले आहे. जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात गेल्या शुक्रवारी भेट झाल्याचे समोर आल्यानंतर या चर्चांना उधाण आले. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Supriya Sule: NDA मध्ये राष्ट्रवादी सामील होणार? राजकीय चर्चांवर सुप्रिया सुळेंचे सर्वात मोठे वक्तव्य... विलिनीकरणावरही मोठी भूमिका
NDA मध्ये राष्ट्रवादी सामील होणार? सुप्रिया सुळेंचे सर्वात मोठे वक्तव्य...
| Updated on: Jul 10, 2026 | 11:26 AM

Supriya Sule On NDA: शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी गेला आठवडा गाजवला. ऑपरेशन तुतारीची एकच चर्चा रंगली. त्यातच जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यात गेल्या शुक्रवारी पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याचे वृत्त धडकले. या घडामोडींमुळे संशयाचे काहूर उठले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाच्या चर्चांना हवा मिळाली. एका पाठोपाठ एक वृत्त धडकू लागले. राष्ट्रवादीतील पाच ते सहा खासदार अस्वस्थ असल्याचा शेरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. त्याने वातावरण अधिक तापले. तर काल संजय राऊतांनी शिंदे-पवार भेटीवर जाहीर नाराजी व्यक्त केली. या सर्व घडामोडीनंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर मन मोकळे केले.

NDA सोबत राष्ट्रवादी जाणार का?

भाजपप्रणीत एनडीएसोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जाणार का? या चर्चेवर सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले. आमच्याशी कोणी बोलत नाहीये, आम्ही कुणाशी बोलत नाहीये. भाजपसोबत जाण्याचा विषयच आमच्या चर्चेत नाही. वर्तमान पत्र आणि टीव्हीवरच या बातम्या सुरू आहेत. त्या सूत्रांची मला गंमत वाटते. असे सुळे यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी मला अनेक वर्षांपूर्वी मला एक गोष्ट सांगितली होती की, चांगलं किंवा वाईट आपली बातमी चालत आहे, याचा अर्थ आपलं नाणं अजून खणखणीत आहे, असा विचार करून आम्ही पुढे जातो. गेल्या 12 वर्षांपासून माध्यमं माझ्या शपथविधीविषयी बातम्या करत आहेत. मोदींचे सरकार आले त्याला 12 वर्षे होतील. हा सवाल मला नेहमी विचारला जातो, अशी विकेटही सुळे यांनी काढली. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कोणताही खासदार अस्वस्थ नसल्याचे त्या म्हणाल्या.  आम्ही सर्व खासदार नियमित संपर्कात आहोत.   एकमेकांना भेटतो आणि विविध विषयांवर चर्चा करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाविषयी म्हणाल्या काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले. अजितदादांची तशी इच्छा होती. आम्ही सर्व एकत्र यावे अशी दादाची मनापासून इच्छा होती. जयंतराव, मी, अजितदादा आणि अजून काही नेते यांना हा विषय माहिती आहे. आता उणीदुणी काढण्यात अर्थ नाही. मी इतिहासात रमत नाही. आम्ही अनेकवेळा भेटलो होतो. पुढे काय करणार हे आमचं ठरलं होतं. आता दादा नाही. मला तो विषय काढायचा नाही. आता आम्ही आमच्या मार्गांनी ते त्यांच्या मार्गांनी असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.

Follow Us