
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या राजकारणाला नवीन वळण मिळाले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी ऐतिहासिक युती केली आहे. यामुळे काही ठिकाणी आनंदाचे वातावरण असेल तरी काही ठिकाणी मनसेला मोठ्या गळतीचा सामना करावा लागत आहे. मनसेचे धडाकेबाज नेते संतोष धुरी यांनी पक्ष सोडल्यानंतर आता मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. शिवडीचे विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे केवळ मनसे नव्हे तर ठाकरे बंधूंना दक्षिण मुंबईत मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
संतोष नलावडे हे मनसेचे ज्येष्ठ नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार बाळा नांदगावकर यांचे उजवे हात मानले जात. शिवडी विधानसभा क्षेत्रात मनसेची संघटनात्मक बांधणी करण्यात नलावडे यांचा मोठा वाटा होता. विशेषतः गिरणगावातील मराठी मतदारांना मनसेशी जोडून ठेवण्याचे काम ते वर्षानुवर्षे करत होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर संतोष नलावडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात धरला आहे. त्यामुळे नांदगावकरांसाठी हा मोठा वैयक्तिक आणि राजकीय धक्का ठरला आहे.
मुंबईच्या सत्तेसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या युतीला शह देण्यासाठी फोडाफोडीचे तंत्र अवलंबल्याचे दिसत आहे. संतोष धुरी आणि संतोष नलावडे यांसारख्या आक्रमक पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात खेचून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या युतीसमोर संघटनात्मक पेच निर्माण केला आहे. वरचे नेते एकत्र आले तरी खालचे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत, असा संदेश या पक्षप्रवेशाद्वारे शिंदे गटाने देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान संतोष नलावडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवडीतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे. शिवडी हा भाग पारंपरिकपणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र मनसेच्या स्थापनेनंतर येथे राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग तयार झाला होता. आता नलावडे शिंदे गटात गेल्यामुळे या भागातील मराठी मतांची विभागणी रोखण्याचे मोठे आव्हान ठाकरे बंधूंसमोर असणार आहे.