मोदींच्या काळात भारत बीफ एक्सपोर्टमध्ये जगात दुसरा, म्हणजे सर्वाधिक गायी… राज ठाकरेंचा थेट हल्ला
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावर सडकून टीका केली आहे. मोदी सरकारच्या काळात भारत गोमांस निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याचा दावा करत त्यांनी सरकारी आकडेवारीचा दाखला दिला आहे.

राज्याच्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या १५ जानेवारीला राज्यातील महापालिकांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी सर्वत्र प्रचार, रॅली आणि विविध नेत्यांच्या सभा आयोजित केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी सामनाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूत्व आणि देशातील गोमांस निर्यातीवरुन सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आहे. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येवर सडकून टीका केली आहे. भाजपचे हिंदुत्व हे केवळ निवडणुकांपुरते आणि सोयीचे असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे. मोदी सरकारच्या काळात देशातील गोमांस (बीफ) निर्यातीत वाढ झाल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला.
देशात सर्वाधिक गायींची हत्या भारतात
यावेळी राज ठाकरे यांनी आकडेवारीचा दाखला देत भाजपला घेरले. काँग्रेस सरकारच्या काळात भारत बीफ निर्यातीत जगात नवव्या क्रमांकावर होता. मात्र, नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याचाच अर्थ असा की, सध्याच्या काळात देशात सर्वाधिक गायींची हत्या केली जात आहे. हे मी बोलत नसून सरकारी आकडेवारीच हे सांगते, असे राज ठाकरे म्हणाले.
हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात
मोदींनी स्वतः एका क्लिपमध्ये बीफ निर्यातदारांना आपले मित्र संबोधले होते. जर तुम्ही गोमातेच्या हत्येचा विरोध करता, तर मग बीफ निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून भाजपला देणग्या कशा मिळतात? असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसेच, देशात हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, हे सर्वात आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सिद्ध केले होते, असेही राज ठाकरेंनी सांगितले.
पाकिस्तानला पुरवणारा कुरूलकर हा देशद्रोही नाही का?
आमचे हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे आहे. आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी अशी स्पष्ट विभागणी करतो. जो मुसलमान या देशावर प्रेम करतो, तो आमचाच आहे. आमचा विरोध केवळ देशद्रोहींना आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी कुरूलकर प्रकरणाचा उल्लेख करत भाजपच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशाची माहिती पाकिस्तानला पुरवणारा कुरूलकर हा देशद्रोही नाही का? असा सवाल त्यांनी केला.
