
सध्या राज्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाच्या अनेक बैठका पार पडताना दिसत आहे. त्यातच आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बहुतांश जागांवर सहमती झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र जिथे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत, अशा तीन महत्त्वाच्या जागांवरून मोठा पेच निर्माण झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ज्या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे आमदार आहेत, तिथल्या किमान तीन जागा आम्हाला हव्याच, अशी आग्रही मागणी मनसेने लावून धरली आहे. यामध्ये माहिम, शिवडी आणि विक्रोळी या तीन विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रभागांचा समावेश आहे. माहिम हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. या ठिकाणी मनसेला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. मात्र, ठाकरे गटाचा येथे जुना बालेकिल्ला असल्याने ते माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे शिवडीतून अजय चौधरी आणि विक्रोळीतून सुनील राऊत हे ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे गट आपल्या आमदारांच्या मतदारसंघात मनसेला जागा देणार का, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन बैठका घेत आहेत. संजय राऊत, अनिल परब, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यात सातत्याने जागावाटपाच्या बैठकांचे सत्र सुरू होते. आतापर्यंत इतर ठिकाणच्या जागावाटपांचा तिढा सुटला असला तरी या तीन जागी मात्र नेत्यांना तोडगा काढता आलेला नाही. परिणामी, आता हा चेंडू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान महायुतीला म्हणजेच भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट यांना टक्कर देण्यासाठी मराठी मतांचे विभाजन टाळणे हे दोन्ही ठाकरेंचे प्राथमिक ध्येय आहे. जर या तीन जागांवरून सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर मनसे-ठाकरेंची युती होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.