Thalapathy Vijay: थलपती विजयच्या टीव्हीकेची सत्ता तामिळनाडूत, जल्लोष धारावीत
CM Joseph Vijay Tamilnadu: तामिळनाडूमध्ये अखेर विजय पर्वाला सुरूवात झाली. जोसेफ विजय, सुपरस्टार थलपती विजय याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री झाला असला तरी त्याचा जल्लोष मुंबईतील धारावीत दिसून आला.

CM Joseph Vijay Tamilnadu: तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेते थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाचा बहुमताचा आकडा गाठलाय. आताच त्याने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी त्याचे आई-वडील, पक्षातील आमदार, त्याचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण त्याची पत्नी आणि मुलं याची अनुपस्थितीचीच सर्वाधिक चर्चा झाली. तामिळनाडूतील त्याचे चाहते आनंदीत झाले आहे. टीव्हीकेची सत्ता तामिळनाडूत आली असली तरी जोसेफ विजयची मुख्यमंत्रीपद वर्णी लागल्याने मुंबईतील धारावी परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धारावी ‘विजय’मय
थलापती विजय यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी परिसरात ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावून आनंद साजरा केला. धारावीतील तामिळ समाजासह अनेक युवकांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष केला. विजय यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे. धारावीतील विविध भागांमध्ये “वेलकम सीएम थलापती” तसेच “TVK ची ताकद तामिळनाडूत दिसणार” अश आशयाचे बॅनर्स लागले आहेत. धारावीतील TVK समर्थकांनी पुढील काळात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क मोहीम राबवण्याचे संकेतही दिले आहेत.
राहुल गांधी सुद्धा शपथविधीला
सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यानंतर विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. विजय यांनी शनिवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे 121 आमदारांच्या पाठिंब्यांचं पत्र दिलं. तर नुकताच त्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सोहळा झाला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. टीव्हीके पक्षाला 107 जागा मिळाल्या होत्या. तर मॅजिक फिगर 118 इतकी होती. काँग्रेसच्या 5 आमदारांनी त्याला अगोदरच पाठिंबा जाहीर केला होता. पण इतर संख्याबळ जमवताना थलपतीला नाकीनऊ आले. गेल्या तीन दिवसांपासून बहुमताचा आकडा गाठताना त्याची मोठी दमछाक झाली. अखेर 6 आमदारांची जुळवाजुळव करायला त्याला तीन दिवस लागले आणि सत्तेचे घोडे एकदाचे नाहले. आता दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी थलपती विजयला मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण त्याने अचाट म्हणावी अशी आश्वासनं जनतेला दिली आहेत.