शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी; या पद्धतीने मिळणार वाढीव मानधन…

| Updated on: Feb 06, 2023 | 10:43 PM

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतच्या निर्णयाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, 22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी; या पद्धतीने मिळणार वाढीव मानधन...
File Photo
Image Credit source: tv 9 Marathi
Follow us on

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने यावर्षीपासून आता एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आजी-आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा गौरव करण्यासाठी म्हणून या वर्षांपासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्याचबरोबर शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतच्या निर्णयाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, 22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

त्यानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 16 हजार रूपये, माध्यमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 18 हजार रूपये तर उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना 20 हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येणार आहे. हे मानधन 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्येदेखील वाढ करण्यात आली असून पूर्णवेळ ग्रंथपालांना 14 हजार रूपये तर पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांना 12 हजार रूपये, कनिष्ठ लिपिकास 10 हजार रूपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती यांना आठ हजार रूपये मानधन मिळणार आहे.

शिक्षण सेवकांच्या मानधानाची माहिती देताना त्यांनी मराठी भाषा विभागाच्यावतीने मराठी भाषा भवन उभारले जाणार आहे. तर मराठी भाषेशी संबंधित सर्व कार्यालये या इमारतीत एकत्र असणार आहेत.

त्याचप्रमाणे छोटी संमेलने आयोजित करता येतील असे सभागृह, सुसज्ज ग्रंथालय, मुंबई बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांसाठी राहण्याची सोयही केली जाणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगत इतर भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दहावी इयत्तेत अडचण निर्माण होऊ नये यासाठी पर्यावरण विषयाप्रमाणे मराठी भाषेसाठी श्रेणी देता येईल का याचा अभ्यासही करण्यात येत असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.

माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुंबईत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद या त्यांच्या जन्मगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही दीपक केसरकर यांनी यावेळी दिली.

तर यानिमित्त चेंबूर येथील 250 विद्यार्थीनी क्षमतेच्या वसतिगृहास माता रमाईंचे नाव देण्यात येणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असून शाळांमधून वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.