एसी लोकलवरुन पुन्हा संघर्ष होणार? बदलापुरातून एसी लोकल पुन्हा सुरू करण्याची रेल्वेची तयारी सुरु, प्रवासी मात्र ठाम

| Updated on: Sep 11, 2022 | 7:46 PM

मध्य रेल्वेने पुन्हा एसी लोकल सुरु करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर पसरला आहे. मुळात एसी लोकल सुरू करायला विरोध नसून आमची साधी लोकल रद्द करून, त्याजागी एसी लोकल सुरू करायला विरोध असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

एसी लोकलवरुन पुन्हा संघर्ष होणार? बदलापुरातून एसी लोकल पुन्हा सुरू करण्याची रेल्वेची तयारी सुरु, प्रवासी मात्र ठाम
पुन्हा संघर्ष होणार?
Image Credit source: social media
Follow us on

बदलापूर – बदलापूरकर रेल्वे प्रवाशांनी (Badlpaur railway passengers)विरोध केल्यानंतर बंद करण्यात आलेली एसी लोकल (AC Local)पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेनं तशी लेखी सूचना बदलापूर स्थानकात लावली असून एसी लोकलबाबत प्रवाशांच्या सूचना मागवल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात एसी लोकल सुरू केल्या होत्या. मात्र सध्या लोकल रद्द करून त्याजागी या लोकल चालवण्यात येत असल्यानं बदलापूरकर रेल्वे प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सलग तीन दिवस आंदोलन (agitation)करत स्टेशन मास्तरांना घेराव घातला होता. त्यामुळं रेल्वे प्रशासनानं नमतं घेत २४ ऑगस्ट रोजी एसी लोकल रद्द करून पुन्हा साधी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण या गोष्टीला १७ दिवस उलटल्यानंतर रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात एक सूचना लावली आहे. ज्यामध्ये रेल्वे प्रशासनाला पुन्हा एसी लोकल सुरू करण्याची इच्छा असून याबाबत प्रवाशांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असं नमूद करण्यात आलंय.

मध्य रेल्वेच्या नव्या प्रयत्नावर प्रवाशी पुन्हा संतप्त

मध्य रेल्वेने पुन्हा एसी लोकल सुरु करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर पसरला आहे. मुळात एसी लोकल सुरू करायला विरोध नसून आमची साधी लोकल रद्द करून, त्याजागी एसी लोकल सुरू करायला विरोध असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. तसंच बदलापूर रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळी येणाऱ्या लोकलमध्ये, अनेकदा दोन लोकलमध्ये एक तास किंवा अर्ध्या तासाचं अंतर असतं. या मधल्या वेळेत एसी लोकल सुरू करण्याची मागणी बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नरसाळे यांनी केली आहे. याबाबत रेल्वेला आमच्या सूचना सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दिला आहे इशारा

एसी लोकल विरोधाच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हेही आक्रमक आहेत. एसी लोकलमुळे त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या कळवा आणि मुंब्रा मतदारसंघातील प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दिवा, मुंब्रा आणि कळवा या तिन्ही रेल्वे स्टेशनावंर गेल्या काही काळात गर्दीत मोठी वाढ झालेली आहे. एसी लोकल सुरु केल्यानंतर, या लोकलचा थांबा या स्टेशनांवर नसल्याने गाड्यांना गर्दी होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यासाठी कळवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी आंदोलनही केले होते. तर मुंब्रा स्टेशनबाहेरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रवाशांची सभा घेत चर्चा केली होती. एसी लोकल हा सामान्य आणि गरीब माणसाचा लढा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुन्हा एसी लोकल सुरु केल्यास संघर्ष होईल, असा इशाराही आव्हाड यांनी यापूर्वीच दिलेला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी पुन्हा एसी लोकल सुरु झाल्यास रेल्वे विरुद्ध प्रवासी असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.