तृतीयपंथीयांचा मंत्रालयासमोर गोंधळ, आंदोलक चांगलेच आक्रमक, नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 12, 2023 | 7:12 PM

तृतीयपंथीयांनी आज मंत्रालयासमोर आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची मागणी केली. पण मुख्यमंत्र्यांची भेट न होऊ शकल्याने तृतीयपंथीयांचं शिष्टमंडळ चांगलंच आक्रमक झालं.

तृतीयपंथीयांचा मंत्रालयासमोर गोंधळ, आंदोलक चांगलेच आक्रमक, नेमकं काय घडलं?
Follow us on

मुंबई : तृतीयपंथीयांनी मंत्रालयासमोर गोंधळ घातल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट न झाल्याने हे तृतीयपंथी आक्रमक झाले. पोलीस भरतीत आरक्षण मिळावं, अशी या आंदोलक तृतीयपंथीयांची मागणी आहे. या मागणीसाठी तृतीयपंथीयांचं शिष्टमंडळ आज मंत्रालयाबाहेर दाखल झालं. या दरम्यान त्या मंत्रालयातही गेल्या. पण त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आंदोलक तृतीयपंथी आक्रमक झाले. त्यांनी मंत्रालयाबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांची पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात आली. दरम्यान, या शिष्टमंडळाचं म्हणणं मांडण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या सचिवांची भेट घेण्यास मंजुरी त्यांना देण्यात आली. पण त्याला त्यांनी विरोध केला.

“आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायला घेऊन जाणार, असं सांगत गाडीत बसवलं. पण नंतर समाज कल्याण विभागाचे सचिव भांगे यांना भेटवण्यासाठी घेऊन जात असल्याचं गाडीत सांगण्यात आलं. आमचा प्रश्न हा गृह खात्याशी आहे. आम्हाला समाजकल्याण विभागाकडे का घेऊन जात आहेत? पोलीस आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत. मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचं त्यांनी भान ठेवावं”, असं आदोलक तृतीयपंथींनी सांगितलं.

तृतीयपंथींची नेमकी मागणी काय?

1) तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत विशेष सेवा भरती म्हणून सामावून करुन घ्या.

2) तृतीयपंथी समुदायाला क्षैतिक आरक्षण देत, अनुदानित संस्था-शासकीय नोकऱ्यांमध्ये सामावून घ्या.

3) तृतीयपंथी कल्याण आणि संरक्षण मंडळाच्या माध्यमातून स्वयंरोजगार आणि उद्योगाला आर्थिक सहाय्यात निधी उपलब्ध करुन द्या.

4) शासकीय अनुदानित आणि विद्यापीठ स्तरावर उच्चशिक्षण, कौशल्य क्षमता शिक्षणाभ्यासक्रमात राखीव व अनुदानीत जागा सक्तिच्या करा.

5) बिंदू क्वीयर राइट्स फाऊंडेशन यांनी उचित उल्लेख केल्याप्रमाणे अल्पवयीन तृतीयपंथी जे घर सोडून पळून जातात, पोलिसांना किंवा सामाजिक संस्थांना सापडतात किंवा ज्या अल्पवयीन तृतीयपंथीयांना घराबाहेर काढले जाते अशा व्यक्तींसाठी स्वतंत्र चिल्ड्रन होम्स असावीत.