बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, शिंदे-फडणवीस VS उद्धव ठाकरे, मुंबईत दोन मोठ्या घडामोडी

| Updated on: Jan 23, 2023 | 6:34 PM

महाराष्ट्राचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती निमित्ताने आज राज्य सरकार (Maharashtra Government) आणि ठाकरे गटाकडून (Thackeray Group) दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, शिंदे-फडणवीस VS उद्धव ठाकरे, मुंबईत दोन मोठ्या घडामोडी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती निमित्ताने आज राज्य सरकार (Maharashtra Government) आणि ठाकरे गटाकडून (Thackeray Group) दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दोन्ही कार्यक्रम हे अतिशय महत्त्वाचे आहेत. या कार्यक्रमांमध्ये कोण काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून आज विधान भवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचा अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही निमंत्रण होतं. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलंय. पण उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीयत. याउलट त्यांनी मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम महाराष्ट्रातील सध्याच्या घडीतील सर्वात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी मानल्या जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारासच बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या कार्यक्रमासाठी विधान भवनात दाखल झाले आहेत. त्यांनी विधान भवनात बाळासाहेबांना अभिवादन केलंय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील विधान भवनात कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असणार आहेत.

या कार्यक्रमाचं बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींनादेखील निमंत्रण देण्यात आलंय. ठाकरे कुटुंबातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे, निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे विधान भवनात उपस्थित आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा

दुसरीकडे षन्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहाच्या दिशेला रवाना झाले आहेत.

उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात जाण्याआधी रिगल सिनेमाजवळ थांबले. तिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं. यावेळी शेकडो शिवसैनिक रिगल सिनेमाजवळ दाखल झालेले होते. बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवानदन केल्यानंतर उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि लहान मुलगा तेजस ठाकरे षण्मुखानंद सभागृहाच्या दिशेला मेळाव्यासाठी रवाना झाले.

या दोन्ही कार्यक्रमांमध्ये कोण काय भूमिका मांडणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.