मरिन ड्राईव्हच्या समुद्रात थरार, मुलाला वाचवण्यासाठी तरुणाची उडी, दोघेही लाटेसोबत बेपत्ता

| Updated on: Jul 06, 2019 | 6:32 PM

मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरातील समुद्रात  दोन  युवक बुडाले आहेत. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. सध्या अग्निशमन दलाचे जवान या बुडालेल्या तरुणांचा शोध घेत आहेत.  

मरिन ड्राईव्हच्या समुद्रात थरार, मुलाला वाचवण्यासाठी तरुणाची उडी, दोघेही लाटेसोबत बेपत्ता
Follow us on

मुंबई : मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरातील समुद्रात  दोन  युवक बुडाले. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. सध्या अग्निशमन दलाचे जवान या बुडालेल्या तरुणांचा शोध घेत आहेत.  मात्र संध्याकाळी 6 वाजल्यानंतर चार तासानंतरही त्यांच्या हाती काही लागलं नाही. दुपारच्या सुमारास एक तरुण आणि एक मुलगा बुडाला. त्यापैकी एकाचं नाव जावेद शेख असून तो ड्रायव्हर आहे. जावेद हा जवळच्याच महात्मा फुले एसआरए सोसायटीत राहतो.

महत्त्वाचं म्हणजे आज समुद्राला मोठी भरती आहे.  या समुद्रात मुलगा बुडत होता. त्यावेळी पोहता येत असलेल्या जावेदने त्याला वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली. त्याला वाचवण्यात जावेदला यश आलं, मात्र एक मोठी लाट आली आणि दोघांनाही आत घेऊन गेली. या लाटेमुळे दोघेही वेगवेगळे झाले. हे दोघे बुडताना पाहून पोलिसांनी जावेदच्या दिशेने दोरी टाकली, ती दोरी जावेदने पकडली, मात्र पुन्हा लाट आली आणि दोरी सुटली. त्यामुळे जावेद लाटेसोबत वाहून गेला. हा सर्व थरार उपस्थित पाहात होते.

या घटनेनंतर कोस्ट गार्ड, अग्निशमन दलाने तातडीने शोधकार्य सुरु केलं. कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने त्यांचा शोध सुरु केला. मात्र त्यांना कुठेही हे दोन्ही तरुण आढळले नाहीत. जावेद हा पट्टीचा पोहणारा आहे, मात्र तरीही त्याला मोठ्या लाटेने ओढून नेले. वेगवेगळ्या यंत्रणा सध्या शोधमोहीम करत आहेत, मात्र चार तासानंतरही त्यांना यश आलं नाही.

शनिवार-रविवार सुट्टीनिमित्त बुडालेला मुलगा मित्रांसोबत मरिन ड्राईव्हवर फिरायला आला होता. मित्रांसोबत तो खडकाळ भागावर होता. त्याचदरम्यान पाणी वाढू लागलं आणि एका मोठ्या लाटेने त्याला समुद्रात ओढून नेलं. तो बुडतोय हे पाहून जावेद शेखने समुद्रात उडी मारुन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र लाटेने दोघांनाही ओढून नेलं.