
उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आणि रामदास कदम यांच्यात वाद पेटण्याची चिन्हं आहेत. आज परब यांनी पत्रकार परिषद घेत डान्सबारवरून कदमांवर आरोपांची राळ उडवून दिली. गृहराज्य मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो तोही पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली. हे गृहराज्य मंत्री नवी मुंबई पर्यंत डान्सबारवर रेड टाकायला जातात. कारण अश्लीलता चालते. अनैतिक धंदा आहे. समाजविघातक कृती आहे. म्हणून रेड करतात. चांगलं काम करतात. पण स्वतच्या आईच्या नावाने जो डान्सबार चालतो त्यावर कोण कारवाई करतो, असा सवाल त्यांनी केला.
माझ्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती
शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि महसूल मंत्र्यावर आरोप केले. त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला बार आहे, त्यात डान्सबार चालवला जात होता. अश्लील नृत्य केलं जात होतं. पैसे उडवले जात होते. मी सर्व माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली आहे. ही माहिती खोटी असू शकत नाही. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत २२ बारबाला, २२ गिऱ्हाईक आणि चार कर्मचारी यांच्यावर कारवाई केली आहे. बारचे नियम तुडवले गेले आहेत. परंतु याबाबत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं की पत्नीच्या नावाने बार आहे. त्यात डिस्प्युट राहिला नाही, असे परब म्हणाले.
त्यांनी माझा उल्लेख अर्धवट वकील म्हणून केला आहे. त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे, मी विधानसभेत वकील म्हणून बोलत नाही. विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो. माझ्या आमदारकीची चौओथी टर्म आहे. विधानसभेचे नियम आणि कायदे मला चांगले माहीत आहे. त्यामुळे मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही.
डान्सबारचा परवाना कोणाच्या नावे?
डान्सबार आम्ही चालवत नाही. आम्ही चालवायला दिला आहे. जो चालवतो त्याच्यावर जबाबदारी आहे, असं त्यांनी सांगितलं. कायद्याच्या तरतुदी आणल्या आहेत. तुमच्या नोकराने, किंवा तुम्ही ज्याला प्राधिकृत केलं त्याने एखादं दुष्कृत्य केलं तर त्याची जबाबदारी कुणाकडे. एक नोकरनामा असतो. तुम्ही कुणाशीही अग्रीमेंट करा, त्याला काही किंमत नाही. कोणताही डान्सबार चालवताना एक नोकरनामा असतो. त्यात चालवणाऱ्याची माहिती द्यावी लागते. माझ्याकडे नोकरनामा आहे. त्यावर मालकाला सही करावी लागते. एखादे कृत्य तुमच्यावतीने जो प्राधिकृत झाला आहे, त्याने केलं तर त्याची जबाबदारी काय? म्हणजे तुमच्या वतीने ज्या कोणी प्राधिकृत केला असेल जो काम करत असेल तो जबाबदार असला तरी हे कृत्य ज्याच्या नावाने परवाना आहे, त्याने केलं. असं समजवण्यात यावं, असा टोला परब यांनी कदम यांना लगावला.
कागदपत्रांत काय काय?
आम्हाला माहीत नव्हतं असं म्हणत असतील तर ३१ तारखेला रेड झाली, तशीच २८ मे २०२३ रोजी झाली होती. दुसरी रेड 10/8/2023 ला झाली होती. म्हणजे दोन दोन रेड या बारवर झाल्या आहेत. याचे पुरावे आहेत. माझे कागद नाही. या एफआयआरच्या कॉपी आहेत. माहितीच्या अधिकारात मिळाली आहे. म्हणजे तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते, पोरी चालवल्या जातात हे तुम्हाला माहीत आहे. हे माहीत असून तुम्ही काळजी घेतली नाही. त्यामुळे या निमित्ताने तुमची जबाबदारी सिद्ध होते, असा दावा परबांनी केला.
तर सहकाऱ्यांचे प्रताप दिले असते भेट
मी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या निमित्ताने भेट रूपाने त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रताप देणार होतो. पण ते आज गडचिरोलीला आहे, असा चिमटा परबांनी काढला. उद्या त्यांना मी हे कागद देणार आहे. डान्सबार आईच्या नावाने आहे मान्य केलंय. डान्सबारचे नियम आहे, ते तुडवले आहे. त्यात महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे. ९च्या नंतरही ठेवता येत नाही. ऑर्केस्ट्रा असेल तर पाच मुलीच काम करतात. पाच मुलींनाच परमिशन देण्याचा नियम असताना १४ मुली काय करत होत्या. मुली स्टेजवरून खाली उतरू शकत नाही. पोलिसांचं रेकॉकर्डिंग असं आहे ज्याच्यात नृत्य करताना, लगट करताना आणि पैसे उधळतानाच्या गोष्टी आल्या आहेत. या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं राहिलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करावी. मी प्रत्येक आठवड्याला मुख्यमंत्र्यांना स्मरण पत्र देणार आहे. काय कारवाई केली विचारणार आहे, असे परब म्हणाले.
शरम वाटली पाहिजे
कदम फॅमिलीची ही जुनी सवय आहे. त्यांना आम्ही तोडपाणी गँग म्हणतो. सगळीकडे रेड करायची आणि त्यांची त्यांच्या दोन्ही मुलांचे भरपूर प्रताप आहे. टप्प्या टप्प्याने बाहेर काढू. प्रदूषण मंडळात किती रेड झाल्या. त्याचं पुढे काय झालं. चाकणच्या रेडमध्ये त्यांना अधिकार होता की नाही. या सर्व गोष्टी आमच्याकडे आल्या. हळूहळू टप्याटप्प्याने आम्ही गोष्ट घेणार आहे.
आईची बदनामी करत आहेत, आईची बदनामी करत आहेत असं ते म्हणतात ना. अरे लाज वाटली पाहिजे आपल्या बायकोच्या नावाने अशा प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला. शरम वाटली पाहिजे. महाराष्ट्राची मान खाली घातली. पत्नीच्या नावाने बार चालतो. त्यात अश्लील डान्स चालतो. त्यात अश्लीलता पसरवली जाते. तुम्ही गृहराज्यमंत्री आहात. आईच्या नावाला बट्टा लागला. लाज वाटते ना. मग असे कृत्य कशाला करता, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तर मुख्यमंत्र्यांनी गृहाराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी परब यांनी केली.