
शिवसेनेत बंड झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केली होती. महायुतीची सत्ता आल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आमच्याकडून जे गेले, ते काय दिवे लावतात ते तुम्ही पाहत आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना.’
शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यात पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, काही वेळा साचलेल्या डबक्याला थोडा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण बाजूला करत नाही. पण जेव्हा तो स्वत:हून जातो त्याची जागा दुसरा घेतो तेव्हा बरं वाटते. चला एक ‘बला’ गेली असे वाटते. आता जे आमच्याकडून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावता आहेत, ते तुम्ही बघतच आहात. त्यामुळे असे दिवटे गेलेले बरे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता आपल्यासोबत आहे, त्यांनी कधीच काही मागितले नाही, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व सामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता माझ्याकडे काही मागण्यासाठी आला नाही. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या शिवसेनेसोबत आहे. जे गेले, त्यांना काही ओळख नव्हती, त्यांना शिवसेनेने मोठे केले. त्या लोकांना ज्यांनी मोठे केले ती लोक आजही माझ्यासोबत आहे. ही माझी शक्ती आहे. तीच त्यांची पोटदुखी आहे. अरे हे अजून संपत कसे नाही, असे ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर प्रहार केला.
शिवसेना कधीही कोणी संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि मूळे खाली गेली आहेत. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात. म्हणून जमीन तुम्ही तुमच्या शत्रूला दिली. मुंबईसह सर्व जमीन तुमच्या मित्राच्या घशात घातली. आम्ही जमीन दोस्ती करणारे आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी कोणाचाही नावाचा उल्लेख न करता सांगितले.