
दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. अजितदादा सरकारच्या काही बैठकांना उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजितदादांनीही या चर्चांवर काहीच भाष्य न केल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. ही टोलेबाजी करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांना तुम्ही मुख्यमंत्री असताना अजितदादा नाराज असायचे का? असा सवाल करण्यात आला. हा सवाल येताच उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. माझ्यावेळी अजितदादांची नाराजी नव्हती. त्यांची नाराजी मी बघितली नव्हती. ते व्यवस्थित होते. अजितदादा चांगलं काम करत होते म्हणून ज्या लोकांची पोटदुखी होत होती. त्यांच्या उरावर आता अजितदादा बसले आहेत. त्यामुळे अजितदादांपेक्षा ज्यांच्या उरावर बसले त्यांनी नाराज झालं पाहिजे. आणि ज्यांच्यामुळे अजितदादा बसले त्यांच्याही उरावर अजितदादा बसले त्यामुळे त्यांनीही नाराज व्हायला पाहिजे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्रात जेव्हा जगभरात कोरोनाचं संकट होतं, तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडी होती. मी मुख्यमंत्री होतो. आज आघाडीचं सरकार नाही. मी मुख्यमंत्री नाही. महाराष्ट्र तोच आहे. आरोग्य यंत्रणा तीच आहे. जग व्यापून टाकणाऱ्या संकटाचा आम्ही मुकाबला केला. तीच यंत्रणा नव्या सरकारने कोलमडून टाकली आहे. तेच डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आणि डीनही होते. आम्ही दुर्गम भागात औषधे पोहोचवले. कोरोना काळात ड्रोनने औषधे पुरवणारं महाराष्ट्र एकमेव राज्य होतं. मी स्वत: नंदूरबारच्या दुर्गम भागातील लसीकरण केंद्राला भेट दिली होती. औषध आणि लसींचा तुटवडा नव्हता. वॉर्ड बॉय आणि परिचरिका योद्ध्यासारखे लढले. आज त्यांना बदनाम केलं जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाणे कळवा, संभाजी नगर, नांदेड आणि नागपूरच्या बातम्या येत आहे. या मृत्यूला जबाबदार कोण? जबाबदारी कोणीही घेत नाही. एक फूल दोन हाफ कुठे आहेत? एक फूल एक हाफ दिल्लीत दुसरं कुठे माहीत नाही. नक्षलवाद्यांशी सामना कसा करायचा याची चर्चा करत आहे. जरूर करा. पण रुग्णालयात बळी का जात आहे याची चौकशी करा.
नांदेडच्याच डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का? कळवा, नागपूर, संभाजीनगरमध्ये बळी गेले. तिथे का नाही? एका मस्तवाल खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले. त्या गद्दारावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणून धमकावण्यासाठी हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला का? असा सवाल त्यांनी केला.
हे सरकार लवकर घालवलं पाहिजे. त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे लोकांचे बळी जात आहेत. जनतेने जागं झालं पाहिजे. माझ्याकडे या सरकारच्या असंख्य तक्रारी येत आहेत. काही शिवसैनिकांकडूनही येत आहेत, असं ते म्हणाले. मी शिवसैनिकांना आवाहन करतो की, डीन आणि डॉक्टरांना विश्वासात घ्या. औषधांचा पुरवठा होत नाही हा त्यांचा दोष नाही. औषधांचा तुटवडा कधीपासून आहे. याची माहिती घ्या, असंही ते म्हणाले.
माझ्या काळात भ्रष्टाचार होता म्हणता. ठिक आहे. काढा. पीएम केअर फंडापासूनचा भ्रष्टाचार काढा. ठाणे, पिंपरी चिंचवडपासून काश्मीर, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील कोरोना काळातील सर्व भ्रष्टाचाराची समान चौकशी करा. आमची तयारी आहे, असं आव्हानच त्यांनी दिलं.
सरकारने राजीनामा द्यावा. आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आरोग्य मंत्र्यांना आरोग्याची माहिती आहे का? आरोग्याबाबतचं ज्ञान तरी आहे काय?, असा टोलाही त्यांनी लगावला.