पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची हत्या, दीड वर्षांनी गूढ उकललं

| Updated on: Jan 02, 2020 | 3:14 PM

महाबुबुर रहमान शेख असं आरोपी पतीचं नाव असून त्याची पत्नी पहिली सीमा शेखही फरार आहे.

पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची हत्या, दीड वर्षांनी गूढ उकललं
Follow us on

वसई : गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला, तरी पोलिसांच्या नजरेतून तो सुटत नाही, हा डायलॉग फिल्मी वाटत असला, तरी वसईतील हत्याकांडाच्या बाबतीत त्याचा पुरेपूर प्रत्यय आला. हत्येनंतर तब्बल दीड वर्षांनी गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपी पतीने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची हत्या (Man Kills Second Wife) केल्याचं उघडकीस आलं आहे.

वसईत दीड वर्षांपूर्वी पतीने पहिल्या बायकोच्या मदतीने दुसऱ्या बायकोची हत्या केली होती. महाबुबुर रहमान शेख असं आरोपी
पतीचं नाव असून त्याची पत्नी पहिली सीमा शेखही फरार आहे. पॉली शेख असे हत्या झालेल्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे

राहत्या घरातच गळा दाबून महाबुबुरने दुसऱ्या पत्नीला संपवलं. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरुन त्याने
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर फेकला. वसई हद्दीत सातिवली खिंड येथील झाडाझुडपांमध्ये मृतदेह फेकून आरोपी जोडगोळी फरार झाली होती.

हेही वाचा : टीव्ही अभिनेत्रीकडून नवऱ्यासमोरच एक्स-बॉयफ्रेण्डची हत्या

हत्येनंतर सहा महिन्यांनी जंगलात एका गोणीत भरलेला महिलेच्या हाडांचा सांगाडा एका आदिवासी महिलेला दिसला होता. यावरुन अज्ञात आरोपीविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सापडलेल्या हाडाच्या सांगाड्याची ओळखही पटत नव्हती. पण ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका चोरट्याला चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. हा चोरटा म्हणजेच महाबुबुर. चौकशीदरम्यान त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीची हत्या करुन मृतदेह वसई हद्दीत फेकला असल्याचं कबूल केलं. अशाप्रकारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं.

31 डिसेंबर रोजी वालीव पोलिसांनी महाबुबुरचा ताबा घेतला असून 6 जानेवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली
आहे (Man Kills Second Wife).