कारसेवेच्या माध्यमातून वाजपेयींचा पुतळा मुंबईत उभारु, अडवून दाखवा, भाजपचं ठाकरे सरकारला आव्हान

| Updated on: Dec 25, 2020 | 6:12 PM

आमच्यावर गुन्हे दाखल केले किंवा आम्हाला तुरुंगात टाकलात तरीही श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणाच, हिंमत असेल तर अडवून दाखवा. | Atul Bhatkhalkar

कारसेवेच्या माध्यमातून वाजपेयींचा पुतळा मुंबईत उभारु, अडवून दाखवा, भाजपचं ठाकरे सरकारला आव्हान
Atul Bhatkhalkar
Follow us on

मुंबई: कांदिवलीच्या क्रीडा संकुलात भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी (Atalbihari Vajpayee) यांचा पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावरुन भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारला खुले आव्हान दिले आहे. कांदिवलीत काही झाले तरी अटलजींचा पुतळा उभारणारच, हिंमत असेल तर सरकारने आम्हाला अडवून दाखवावे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे. (Atul Bhatkhalkar slams Thackeray govt)

ते शुक्रवारी कांदिवलीत झालेल्या कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कांदिवली पूर्व येथील क्रीडा प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या क्रीडा संकुलाच्या नामांतराला व श्रद्धेय अटल बिहारी यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भाजप तीव्र निषेध करतो. आमच्यावर गुन्हे दाखल केले किंवा आम्हाला तुरुंगात टाकलात तरीही श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणाच, हिंमत असेल तर अडवून दाखवा, असे आव्हान भातखळकर यांनी दिले आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या संसदेतील पहिल्या भाषणाच्या नंतर 1957 मध्ये देशाचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्तुती करताना म्हणाले होते की ‘अटलजी अत्यंत प्रभावी असून एक दिवस नक्कीच या देशाचे प्रधानमंत्री होतील’. अशा अजातशत्रू स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा व त्यांच्या पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमाला असहिष्णू महाविकास आघाडी सरकारने विरोध करून अत्यंत घाणेरडे राजकारण चालविले आहे.

केवळ विरोध करून हे सरकार थांबले नसून या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशा सूचना सुद्धा केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना देण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकीही देण्यात आली आहे. तसे धमकीचे पत्रच राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम, झाकीर नाईक यांसारखे आतंकवादी व देशद्रोही आपलेसे वाटणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आयुष्यभर राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या स्व. अटलजींच्या पुतळ्याबद्दल विरोध करणे स्वाभाविकच असल्याची टिप्पणीही यावेळी अतुल भातखळकर यांनी केली.

‘कारसेवा करुन अटलबिहारी वाजपेयींचा पुतळा उभारु’

स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला महाविकास आघाडी सरकारने पुढील तीन महिन्यात रीतसर परवानगी न दिल्यास, भारतीय जनता पक्षाचे हजारो कार्यकर्ते ‘कारसेवेच्या’ माध्यमातून श्रद्धेय अटलजींचा पुतळा त्या ठिकाणी उभारतील, असा इशाराही भातखळकर यांनी दिला.

संबंधित बातम्या:

अजानमुळे मनशांती मिळणाऱ्या ठाकरे सरकारला हिंदू शब्दाचे वावडे: अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

(Atul Bhatkhalkar slams Thackeray govt)