Rain Update : आनंदवार्ता, पावसाचा सांगावा, मोठ्या विश्रांतीनंतर या दिवशी राज्यात धो धो बरसणार

Weather Update : राज्यातील शेतकरीच नाही तर सर्वसामान्याना सुद्धा पावसाची चातकासारखी प्रतिक्षा लागलेली आहे. अधीर मन, मधूर घनाची वाट पाहत आहेत. उकड्यानं हैराण झालेल्या जनतेला पावसाचा निरोप आला आहे. या दिवशी राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे.

Rain Update : आनंदवार्ता, पावसाचा सांगावा, मोठ्या विश्रांतीनंतर या दिवशी राज्यात धो धो बरसणार
पावसाचा सांगावा
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 11, 2025 | 8:37 AM

राज्याला पावसाची प्रतिक्षा आहे. अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने राज्याला तडाखा दिला. पण त्यानंतर त्याने पाठ फिरवली. त्यामुळे सर्वच जीवांची लाही लाही सुरू आहे. उकाड्याने सर्वांचेच हाल हाल होत आहे. घामट्याने जनता बेजार झाली. आता पावसाने सांगावा धाडला आहे. पावसाचा निरोप येऊन धडकला आहे. या दिवशी पावसाने आबादानी होणार आहे. त्यामुळे खोळंबलेल्या पेरणीला, शेतीच्या कामांना वेग येणार आहे. तर पाणवठे, नाले, नद्या पुन्हा ओसंडून वाहतील. दडी मारलेला पाऊस राज्यात लवकरच सक्रिय होणार आहे.

आता संपली प्रतिक्षा

राज्यातील काही भागांत अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत, तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तेथे उन्हाचा ताप वाढला आहे. मौसमी पाऊस राज्यात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असले तरी जूनमध्ये काही भागात अजूनही तापमान 40 अंशाच्या पार नोंदले गेले.

राज्यात शुक्रवारनंतर मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असेही हवामान विभागाने सांगितले आहे. यंदा लवकर दाखल झालेल्या मौसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून राज्यात उघडीप दिली आहे. पण या आठवड्याच्या अखेरीस पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होणार आहे.

विदर्भ-मराठवाड्यात पारा चढताच

विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस झालेला नाही. गेले तीन ते चार दिवस तेथील तापमान चाळीसपार नोंदले गेले आहे. राज्यात मंगळवारी सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली. या ठिकाणी ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मागील काही दिवसांपासून या ठरावीक भागात तापमानाची सर्वाधिक नोंद झाली आहे.

राजस्थान, जोधपुर या काही भागात सध्या उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती आहे. याठिकाणी वाहणारे वारे हे मोठ्या प्रमाणात उष्णता वाहून आणत आहेत.. त्याचबरोबर विदर्भ तसेच मराठवाड्यात आर्द्रता तसेच ढगांची निर्मिती होत असल्यामुळे या भागात तापमान वाढ झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

तूर्तास पाणी कपात नाही

मुंबईला राखीव साठ्यातून पाणी जलसाठा १० टक्क्यांवर, मात्र तूर्तास पाणी कपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा १० टक्क्यांवर आल्यामुळे येत्या २ दिवसांत राखीव साठ्यातून मुंबईची तहान भागविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबईचा पाणीसाठा १० टक्क्यांपेक्षा खाली आल्यास भातसा व अप्पर वैतरणातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.

त्यानुसार उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा मुंबईला उपलब्ध होणार आहे. मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. यातून मुंबईला दररोज तीन हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

पाण्याची वाढती मागणी, तलावांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे सध्या धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. सध्या सात धरणांत एकूण १ लाख ४५ हजार ७१३ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा पाच टक्के जास्त असला तरीही पाणी चिंता कायम आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून उपलब्ध करून दिलेल्या पाण्याचा वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हा राखीव साठा ३१ जुलैपर्यंत पुरणार असल्याचे मत पालिकेकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांवर तूर्तास तरी पाणी कपातीची टांगती तलवार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.