
कोर्टाच्या आदेशानुसार मुंबईतील कबूतर खाने बंद झाले आहेत. हे कबूतर खाने पुन्हा सुरु व्हावेत अशी मागणी काहीजण करत आहेत. त्यासाठी आज दादरच्या योगी सभागृहात कबूतर बचाओ धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. या धर्मसभेच्या निमित्ताने जैन, हिंदू,बौद्ध धर्मगुरु एकाच मंचावर आले. या धर्म सभेत कैवल्यरत्न महाराज यांनी एक वक्तव्य केलं. त्यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘एखाददुसरा व्यक्ती मेल्याने काय होतं?’ असं कैवल्य रत्न महाराज यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘मी डॉक्टरांना मूर्ख मानतो’ असं देखील ते म्हणाले. “कबूतर एक बहाणा आहे. कबुतराला एक शस्त्र बनवलं आहे. कबूतराशी काही देणंघेणं नाही. कबूतराच्या विष्ठेतून जो रोग पसरतो त्याच्याशी देणंघेणं नाही. एखादा माणूस मेला त्याच्याशी काही देणं घेणं नाही” अशी वक्तव्य कैवल्य रत्न महाराज यांनी केली आहेत.
झाडाचं पान अंगावर पडून मेला हे मान्य कराल का?
“हजारो, लाखो निष्पाप लोक मरतायत, त्या बद्दल कोणी विचार करत नाहीय. पाण्यासासाठी तडफडतायत त्या बद्दल कोणाकडे विचार करायला वेळ नाही. एखादा माणूस झाडाचं पान अंगावर पडून मेला हे मान्य कराल का? हा मूर्खपणा आहे. कबुतराच्या विष्ठेमुळे जीव जाईल का? असं बोलत असतील, तर मी डॉक्टरांना सुद्धा मूर्ख मानतो” असं वक्तव्य कैवल्य रत्न महाराजांनी केलं.
‘मिशनरी वाले गरिबांना फसवत आहेत’
“ही शांती सभा नाही तर क्रांती सभा आहे. एक संकल्प करण्यासाठी जमलो आहोत. आज असं वाटते की एक छोटासा कुंभ होतोय. जेव्हा राष्ट्र धर्माची हानी होते म्हणून एवढे आक्रमक व्हावे लागत आहे. आमचा वारकरी संप्रदाय मोठा आहे. कोणत्याही कसायाजवळ हत्यार आहे, गाय वाचवण्यासाठी निघाले त्यांच्या जवळ हत्यार नाही. या देशाच्या संस्कृतीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आपला धर्म गायीला मानतो. मिशनरी वाले गरिबांना फसवत आहेत” असं अखिल भारतीय सन समिती महामंत्री भारतानंद सरस्वती म्हणाले.