
अजित पवारांना सोबत घेवून, भाजपनं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली, अशा शब्दात संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून भाजपला खडेबोल सुनावले आहेत. शिंदेंना सोबत घेतल्यानंतर बहुमत असताना अजित पवारांना सोबत घेण्याची गरजच काय होती ? असा सवाल संघाच्या मुखपत्रातून करण्यात आलाय. महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला बहुमत असतानाही अजित पवार गटाला सोबत घेतलं. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला सहज बहुमत मिळालं असतं, चुलत भावांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद कमी झाली असती. हे चुकीचे पाऊल का उचलले गेले ?, अनेक वर्षे काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपच्या समर्थकांना धक्का बसला. एका फटक्यात अजित पवारांना सोबत घेवून भाजपनं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली.
भाजप ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख सांगतो, परंतू भाजपची ओळख ‘पार्टी विदाऊट एनी डिफरन्स’ अशी झाली आहे. संघाला दहशतवादी संघटना म्हणून हिणवलेल्या काँग्रेसजनांना भाजपने नेते बनवलं आहे. तर अजित पवारांना घेण्याचा निर्णय भाजपचा होता. संघाच्या मुखपत्रातील वक्तव्य गांभीर्यानं घेण्यासारखं असून भविष्यात मोठा निर्णय अपेक्षित असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
आता मोठा निर्णय कोणता ?, यावरुन खलबतं सुरु झाली आहेत. अजित पवारांना सोबत घेवून भाजपला वर्ष झालं. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा जबर पराभव झाला. अजित पवारांना घरात अर्थात बारामतीतही जिंकता आलं नाही. त्याच पार्श्वभूमीवर संघानं मुखपत्रातून संताप व्यक्त केलाय.
तर लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांवर खापर फोडलं जात असल्याचं काँग्रेसच्या सतेज पाटलांनी म्हटलंय. अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांनाही धक्का बसला असं संघानं मुखपत्रातून म्हटलंय. मात्र 10 महिन्यांआधी फडणवीसांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती ही पॉलिटिकल असल्याचं म्हटलं होतं.
शिंदेंच्या बंडानंतर सत्तेची चक्र फिरली आणि पुन्हा भाजप सत्तेत आली. मात्र वर्षभरातच अजित पवारांनी बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी केली. भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुती झाली. मात्र लोकसभेच्या निकालात जनतेनं जो कौल दिला, त्याला अजित पवार जबाबदार असल्याचं सूचकपणे संघाच्या मुखपत्रातून छापण्यात आलंय.