…तर मोदीसाहेब बोलताहेत ते सर्व धर्मांच्या विरोधात आहे का?, नवाब मलिकांनी भाजप नेत्यांना फटकारले

| Updated on: Aug 09, 2021 | 6:42 PM

राज्य सरकार एका धर्माच्या विरोधात काम करत आहे, असा भाजपचा आरोप असेल तर मग मोदीसाहेब बोलत आहेत ते सर्व धर्माच्या विरोधात बोलत आहेत का? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

...तर मोदीसाहेब बोलताहेत ते सर्व धर्मांच्या विरोधात आहे का?, नवाब मलिकांनी भाजप नेत्यांना फटकारले
nawab malik
Follow us on

मुंबई : राज्य सरकार एका धर्माच्या विरोधात काम करत आहे, असा भाजपचा आरोप असेल तर मग मोदीसाहेब बोलत आहेत ते सर्व धर्माच्या विरोधात बोलत आहेत का? सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे तो धुडकावण्याचे काम जनतेने करावे का? अशी भूमिका भाजप आमदारांची असेल तर त्यांना विधानसभेच्या सदस्यपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मांडली आहे. (Whatever Narendra Modi speaking is that against Community; Nawab Malik’s question to BJP leaders)

राज्यात हिंदू सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या परिपत्रकावरील तारीख फक्त बदलली. निर्बंध तेच असून हा हिंदूंवर अन्याय आहे, असं सांगतानाच ममता बॅनर्जी यांनी जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण केली. तिच परिस्थिती ठाकरे सरकारला राज्यात घडवायची आहे, असा घणाघाती हल्ला भाजप आमदार नितेश राणे यांनी चढवला होता. त्यावर आता महाविकास आघाडीने प्रत्युत्तर दिलं आहे. जो सुप्रीम कोर्टाचा आदर करत नसेल, स्वतःच्या पक्षाच्या नेत्याचे ऐकत नसेल, त्यांचं लोकं किती ऐकतील असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

देशाचे पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये भविष्यात सण येत असताना गर्दी होणार नाही याची सरकारने काळजी घेतली पाहिजे असे सांगितले होते. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने सणासुदीला गर्दी करु नका याची दक्षता राज्य सरकारने घेतली पाहिजे, असे निर्देश दिले आहेत. असे असताना भाजपचे आमदार अशी वक्तव्ये करत असल्यामुळे नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे?

राज्य सरकारने गणेशोत्सवा संदर्भात नियम जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारने जारी केलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी करतानाच मागण्यांचं निवेदन राज्यपालांना दिलं. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सर्वच हिंदू सणांवर नियोजितपणे निर्बंद कसे टाकायचे यावर ठाकरे सरकारने भर दिला आहे. विविध सणांवर निर्बंध लावून सणाचे महत्व कसं कमी करायचं हाच किमान समान कार्यक्रम ठाकरे सरकारचा राहिला आहे. असंच दिसतंय. गणेशोत्सावासाठी जी नियमावली काढली, ती गेल्यावर्षीचीच आहे. फक्त तारीख बदललीय. या नियमावलीत सण साजरा करू नये असे नियम टाकले आहेत. गणेशोत्सवातील उत्साहाचं वातावरण मुंबईत असायचं. त्याला नियोजित पद्धतीने संपवायचं काम ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप राणे यांनी केला.

हिंदू खतरे में है

जे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करत आहेत. तेच काम उद्धव ठाकरे महाराष्ट्र आणि मुंबईत करत आहेत. हिंदू खतरे में है अशी परिस्थिती बंगालमध्ये होती. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात घडवण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. याबाबतची माहिती राज्यपालांना दिली आहे. त्यावर राज्यपालांनी तुम्ही तुमचं काम करा, मला काय करायचं ते मी करतो, असं आश्वासन दिलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

इतर बातम्या

VIDEO: शिवसेना-भाजपची युती होणार की नाही? शिवसेना खासदारानं इनसाईड स्टोरी जगजाहीर केली, बघा काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाचं मनसेकडून पहिल्यांदाच जाहीर स्वागत; काय आहे मनसेचं ट्विट?

पेगाससद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, लोकशाही वाचवण्यासाठी देश एकवटल्याशिवाय राहणार नाही: जयंत पाटील

(Whatever Narendra Modi speaking is that against Community; Nawab Malik’s question to BJP leaders)