
मुंबईतील डोंगरी परिसरात फुटपाथवरच एका महिलेची प्रसुती करण्यात आली. या परिसरातून चालत असताना संबंधित गर्भवती महिलेला अचानक वेदना सुरू झाल्या. वेदना असह्य झाल्याने ती महिला फूटपाथवरच विव्हळत बसली. तेव्हा स्थानिकांनी तिची मदत करत याबद्दल पोलिसांना तातडीने माहिती दिली. डोंगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने महिलेला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु जवळच्या रुग्णालयात नेण्याची हालचाल सुरू असतानाच वेदना बळावल्या आणि अखेर महिलेची प्रसुती रस्त्यावरच झाली. नंतर संबंधित महिलेला आणि तिच्या बाळाला इतरांच्या मदतीने तात्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या तपासणीनंतर आई आणि बाळ दोघंही सुखरुप असल्याचं कळतंय. त्यामुळे प्रसंगावधान राखत मुंबई पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांनी जी कामगिरी केली, त्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.
दोन महिला पोलीस कर्मचारी आणि नवजात शिशूसोबतचा फोटो पोस्ट करत मुंबई पोलिसांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर घटनेबद्दलची माहिती दिली. ‘डोंगरी परिसरातील उमरखाडी इथं एका महिलेला फुटपाथवरच प्रसुती वेदना होत असल्याचं कळताच डोंगरी पोलीस स्टेशनचे अधिकारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. प्रसुतीनंतर संबंधित महिलेला आणि नवजात बाळाला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक महिलांच्या मदतीने सुरक्षितपणे जे. जे. रुग्णालयात नेलं. आई आणि बाळाची प्रकृती आता चांगली आहे’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.
Upon learning that a woman had gone into labour on a pavement in the Umarkhadi, Dongri area, officials from @DongariPS immediately rushed to the location. After the delivery, women police personnel from Mobile 5 and 1, along with help from local women, ensured that the mother and… pic.twitter.com/4ikVqUtGu3
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) December 1, 2025
डोंगरी परिसरातून चालत असताना अचानकपणे 36 वर्षीय माला नाडर या गर्भवती महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या. फुटपाथवरच वेदनेनं विव्हळत असताना स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेण्याची हालचाल सुरू केली. त्यादरम्यान महिलेच्या वेदना आणखी तीव्र झाल्या आणि तिथेच प्रसूती झाली. यावेळी पोलिसांनी स्थानिक महिलांच्या मदतीने चादर, वस्त्र घेऊन आडोसा तयार केला. त्यानंतर संबंधित महिलेला आणि बाळाला वस्त्रामध्ये गुंडाळून जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी बाळाची नाळ कापली आणि त्यानंतर तपासणी केली. बाळ आणि बाळंतीण सुखरुप असल्याचं त्यांनी सांगितलं.