Maharashtra Politics: ‘2029ला मविआचं सरकार, फक्त 2 चकरा मारण्यासाठी पालकमंत्री करा’ शरद पवारांच्या खासदाराने मनातलं सांगितलं
गृहमंत्री जाऊ द्या पण मला सरकार आल्यावर सहा महिने पालकमंत्री करा. मला शिर्डीतून वाँग वाँग करत नगरला गाडी आणायची आहे अन् परत शिर्डीला जायचं आहे," अशी इच्छा खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे व्यक्त केली.

कुणाल जयकर प्रतिनिधी: ‘महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सहा महिने पालकमंत्री करा, सहा महिने गृहमंत्री करा मगं सगळ्यांच्या बत्त्यागुल केल्या नाही तर बघा असं म्हणत, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे केली . जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. नेमकं काय काय म्हणालेत? वाचा सविस्तर..
काय म्हणाले निलेश लंके?
“पोलीस लोक खूप त्रास द्यायचे, मी त्यांना सांगितले थांबा जरा सरकार येऊ दे. सहा महिने मला पालक मंत्री करा अन् सहा महिने गृहमंत्री करा. गृहमंत्री जाऊद्या पण मला सरकार आल्यावर सहा महिने पालकमंत्री करा. मला शिर्डीतून वाँग वाँग करत नगरला गाडी आणायची आहे अन् परत शिर्डीला जायचं आहे,” अशी इच्छा खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे व्यक्त केली.
पुढे बोलताना “या दोन चकरा मारल्या अन् मला घरी जा म्हटले तर घरी जाईन तुम्हालाही माहिती आहे मी तुमच्या सगळ्यांच्या शब्दावर एकवर्ष आधी विधानसभेचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तुम्ही मला फक्त दोन चकरा शिर्डी ते नगर अन् नगर ते शिर्डी मारायला दिल्या. नंतर गाडी सोडून एसटीने यायला सांगितले तरी मी येईन,” असं निलेश लंके म्हणाले.
2029 ला मविआचं सरकार!
त्याचबरोबर पुढे लाल दिव्याच्या गाड्या अन् मागे लाल दिव्याच्या गाड्या. कलेक्टर साहेब डायऱ्या घेऊन माझ्या मागे, असे म्हणत साहेब हसले म्हणजे करतील, अशी मिश्किल कोपरखळीही त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना लगावली. 2029 ला आपले जुळेल, म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, असं म्हणत सगळ्यांचा हिशोब चुकता होईल असा इशाराही यावेळी निलेश लंके यांनी दिला.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळवला. निलेश लंके यांनी पारनेर विविध सेवा सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवत भारतीय जनता पक्षाच्या राहुल शिंदे यांचा पराभव केला. या निवडणुकीत 104 मतांपैकी निलेश लंके यांना 63 मते मिळाली.