Nagar Panchayat Election Result : निवडणुकीच्या निकालानंतर तुफान हाणामारी, दगडफेकीच्या घटनेनं मोठा तणाव; नेमकं काय घडलं?

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होताच काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाद वाढू नये म्हणून पोलिसांना पाचारण करावे लागले.

Nagar Panchayat Election Result : निवडणुकीच्या निकालानंतर तुफान हाणामारी, दगडफेकीच्या घटनेनं मोठा तणाव; नेमकं काय घडलं?
nashik yeola election result
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 21, 2025 | 6:23 PM

Nagar Panchayat Election Result : राज्यात नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अनेक ठिकाणी विजय झाला आहे. एकूण 288 नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. यातील साधारण 213 नगराध्यक्षपदांची निवडणूक महायुतीने जिंकली आहे. महायुतीच्या घटकपक्षांनी एकूण 50 नगराध्यक्षपदांची निवडणूक जिंकली आहे. आकडेवारीतच सांगायचे झाले तर भाजपाने एकूण 118 नगराध्यक्षपदांवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवला. तर शिवसेनेचा एकूण 58 जागांवर विजय झाला आहे. काँग्रेसलाहा 31 जागांवर तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 37 जागांवर विजय मिळवता आला आहे. ठाकरे गटाला फक्त 9 नगराध्यक्षपदांवर विजय मिळवता आला आहे. दरम्यान, आता निकाल स्पष्ट झालेला असला तरी काही ठिकाणी मात्र मतमोजणीच्या प्रक्रियेला गालबोट लागले. काही ठिकाणी निकालानंतर दोन गटांत वाद झाला आहे.

नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील येवला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारच्या निकालानंतर शहरातील मोमीनपुरा भागात तुफान हाणामारी झालेली पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पराभवामुळे हा वाद वाद उफाळल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला आहे. या हाणामारीत तीन पुरुष व एक महिला जखमी झाली आहे. आता सर्व जखमींना येवला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केला जात आहे. ही घटना समजताच येवला शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास चालू करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही मारामारी

छत्रपती संभाजीनगरातील पैठणमध्ये दोन पराभूत उमेदवारांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. वादानंतर दोन्ही उमेदवारांच्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. या वादात पाच जण जखमी झाले आहेत. दोन्ही पराभूत उमेदवारांनी निवडणुकीतील अपयशाला एकमेकांना जबाबदार धरले. त्यामुळे दोन्ही पराभूत उमेदवार आणि त्यांचे गट एकमेकांशी भिडले. त्यानंतर पैठणच्या नेहरू चौकामध्ये निवडणुकीच्या वादावरून दगडफेक झाली.

दुसरीकडे धुळे जिल्ह्यातदेखील निकालानंतर वाद झाला. विजयी मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केली. शिरपूर शहरातील वाल्मिक नगर भागात हा प्रकार घडला. त्यानंतर या भागात पोलीस दाखल झाले होते.