
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचयात निवडणुकीचा निकाल आता अखेर समोर आला आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं असून, राज्यात महायुतीचे तब्बल 214 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. स्थानिक आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार 25 ठिकाणी विजयी झाले आहेत. भाजप हा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या 117 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. दरम्यान राज्यात अशा देखील काही लढती होत्या जिथे एकाच घरातील अनेक जणांना उमेदवारी देण्यात आली होती, काही जणांना नगराध्यक्षपदाचं तिकीट देण्यात आलं होतं तर काही जाणांना नगरसेवकपदाची उमेदवारी देण्यात आली होती, त्यातील काही जणांना पराभव झाला आहे, तर काही जण विजयी झाले आहेत, त्याचाच हा आढवा.
पैठण नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व दिसून आलं आहे, या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या भूषण कावसानकर या विजयी झाल्या आहेत, त्यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार लोळगे यांचा पराभव केला आहे. विद्या कावसानकर 160 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार जयश्री चाटूपळे यांचा पराभव झाला आहे, जयश्री चाटूपळे यांचा शंभर मतांनी पराभव झाला आहे.
दरम्यान दुसरीकडे बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांना मोठा झटका बसला आहे. वामन म्हात्रे यांच्या एकाच घरातील सहा उमेदवारां पैकी तीन उमेदवार विजयी झाले आहेत, तर तीन उमेदवारांचा पराभव झाला आहे. स्वत: वामन म्हात्रे, त्यांचा भाऊ तुकाराम म्हात्रे आणि उषा तुकाराम म्हात्रे यांचा विजय झाला आहे, तर वामन म्हात्रे यांचा मुलगा वरून म्हात्रे, भावेश म्हात्रे आणि वामन म्हात्रे यांच्या पत्नी व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विणा म्हात्रे यांचा पराभव झाला आहे.
तर करमाळा नगपालिका निवडणुकीत भाजपकडून उभे असलेले भाऊ, भावजयी आणि बहिणीचा एकाचवेळी विजय झाला आहे. लता घोलप, सचिन घोलप आणि निर्मला गायकवाड याचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांनी एकत्रित मोठा जल्लोष केला.