
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूरच्या गोधनी रेल्वे परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या २३ वर्षांच्या एका तरुणीची तिच्या शेजारी राहणाऱ्या ३८ वर्षीय नराधमाने निर्घृणपणे हत्या केली. प्राची खापेकर असे या तरुणीचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
प्राची हेमराज खापेकर ही बी.ए. शेवटच्या वर्षाला शिकत होती. ती तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेअर ट्रेडिंगचे धडे घेत होती. या घटनेच्या दिवशी तिचे वडील आणि भाऊ कामावर गेले होते, तर आई सुद्धा काही कामासाठी बाहेर गेली होती. घरात प्राची एकटी असल्याचे पाहून शेजारी राहणारा शेखर अजाबराव ढोरे याने दुपारी तिच्या घरात प्रवेश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेखर हा गेल्या अनेक दिवसांपासून प्राचीला फॉलो करत होता. त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, प्राचीने त्याला नकार दिला होता. याच नकाराचा राग मनात धरून शेखरने घरी कोणी नसताना संधी साधली. काल घरी कोणी नसताना तो प्राचीच्या घरात शिरला. यानंतर त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या शेखरने आधी प्राचीचा गळा आवळला. नंतर तिचे डोके जोरात भिंतीवर व जमिनीवर आपटले. यात प्राचीच्या मेंदूला गंभीर इजा झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
यानंतर प्राचीचा मृत्यू झाला हे कळताच आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी अत्यंत थंड डोक्याने कट रचला. त्याने प्राचीचीच ओढणी घेतली आणि तिला पंख्याला लटकवून आत्महत्येचा बनाव रचला. सुरुवातीला कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आणि ही आत्महत्या असावी असा संशय होता. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना संशय आला.
यानंतर प्राचीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली. प्राचीचा मृत्यू फाशीमुळे नाही तर डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाला आहे. तिच्या अंगावर झटापटीच्या खुणा आढळल्या. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शेखरला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.