
नागपूर जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपुरात गेल्या २४ तासात ४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. रामटेक तालुक्यातील सोनेघाट गट ग्रामपंचायतीच्या हद्दीतील प्रसिद्ध जपाळेश्वर (चपाळेश्वर) देवस्थानात तलावात मामा-भाचीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्ये दुसऱ्या एका तलावात दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत एकूण चार जणांना जलसमाधी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
नागपुरातील जपाळेश्वर देवस्थान येथील तलावाचे पाणी अनेक ठिकाणी खूप खोल आहे. या ठिकाणी एका १३ वर्षांच्या मुलीला वाचवताना तिच्या मामाचाही बुडून मृत्यू झाला. वडिलांच्या डोळ्यांसमोर हा संपूर्ण प्रसंग घडल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. हर्षाली विनोद माकडे (वय १३, रा. भोजापूर, मानापूर) आणि अजय वामन लोहबरे (वय ३३, रा. खातजी, भंडारा) अशी या दोघांची नावे आहेत.
हर्षाली तिचे वडील विनोद माकडे आणि मामा अजय लोहबरे यांच्यासोबत जपाळेश्वर देवस्थान येथे पोहण्यासाठी आली होती. हा तलाव प्रसिद्ध असल्याने अनेक जण येथे येत असतात. काल सकाळच्या वेळी हर्षाली तलावाच्या पाण्यात उतरली. सुरुवातीला पाण्याचा अंदाज आला नाही. यानंतर काही वेळातच ती खोल पाण्यात जाऊ लागली आणि गटांगळ्या खाऊ लागली. आपली मुलगी बुडत असल्याचे तिच्या वडिलांच्या आणि मामाच्या लक्षात आले.
भाची बुडत असल्याचे पाहताच मामा अजय वामन लोहबरे यांनी क्षणाचाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी तत्काळ पाण्यात उडी मारली. मामा भाचीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. पण पाण्याचा तळ आणि खोली यांचा अंदाज त्यांनाही आला नाही. अथक प्रयत्नानंतर पाण्याचा दाब आणि खोलीमुळे मामा आणि भाची दोघेही खोल पाण्यात बुडाले. त्यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला.
हर्षालीचे वडील विनोद माकडे यांच्यासाठी आपल्या मुलीला आणि तिला वाचवणाऱ्या मेहुण्याला डोळ्यादेखत गमावले. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्वरित धाव घेतली. स्थानिक गोताखोरांच्या मदतीने दोन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच पुढील तपासणीसाठी दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे नेण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर दोन्ही मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. या घटनेमुळे जपाळेश्वर देवस्थान आणि खातजी (भंडारा) तसेच भोजापूर (मानापूर) या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे.