नागपूरकरांची नजर आकाशाकडे! विमानांच्या कवायती अन् टाळ्यांचा कडकडाट, एअर शोचा असा रंगला थरार
Nagpur: भारतीय वायुसेनेकडून आज नागपूरमध्ये भव्य आणि चित्तथरारक 'एअर शो'चं आयोजन करण्यात आलं. वायुसेनेच्या जवानांनी सादर केलेल्या थरारक कवायती आणि प्रात्यक्षिकांनी उपस्थितांसह संपूर्ण नागपूरकरांचं मन जिंकून घेतलं.

Nagpur: भारतीय हवाई दलाच्या वतीने नागपुरात ‘एअरफेस्ट 2026’ या भव्य एअर शोचं आयोजन करण्यात आलं. शोचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय वायुसेनेकडून आज नागपूरमध्ये भव्य आणि चित्तथरारक ‘एअर शो’चं आयोजन करण्यात आलं. वायुसेनेच्या जवानांनी सादर केलेल्या थरारक कवायती आणि प्रात्यक्षिकांनी उपस्थितांसह संपूर्ण नागपूरकरांचं मन जिंकून घेतलं. सध्या शहरात सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विमानांच्या कवायतींची चर्चा रंगली आहे.
नागपूरच्या वायुसेना नगर येथे एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात ‘आकाशगंगा’ स्काय ड्रायव्हिंग डिस्प्लेने झाली. त्यानंतर सुखोई एमकेआय (Sukhoi MkI) विमानांच्या फ्लायपास्ट फॉर्मेशनने आकाशात मनमोहक दृश्य निर्माण केलं आहे. एअर वॉरियर ड्रिलद्वारे वायुसेनेची शिस्त आणि कडक डिसिप्लिन पाहायला मिळाली. यासोबतच सारंग हेलिकॉप्टर एरोबॅटिक डिस्प्ले, पॅरा मोटर डिस्प्ले आणि सूर्यकिरण एरोबॅटिक डिस्प्लेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे.
एअर शोमध्ये पॅराग्लायडरच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली प्रात्यक्षिके आणि जमिनीवर यशस्वी लँडिंग विशेष लक्षवेधी ठरले. तसेच सारंग हेलिकॉप्टरने आकाशात केलेल्या विविध कवायतींनी उपस्थितांची दाद मिळवली. सूर्यकिरण विमानांच्या जोरदार एन्ट्रीनंतर आकाशातील थरार अधिकच वाढला. एकमेकांच्या समोरून झेप घेणाऱ्या विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना अनेकांचा काळजाचा ठोका चुकत होता. वायुसेनेच्या या अचूक आणि धाडसी कवायतींवर नागपूरकरांनी टाळ्यांचा कडकडाट करत आणि अभिमानाने दाद देत जवानांचे कौतुक केले.
वायुसेना नगरमधील या एअर शोसाठी केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला होता. मात्र, एअर शो पाहण्याची उत्सुकता आणि वायुसेनेबद्दलचा अभिमान यामुळे संपूर्ण शहरातील विविध भागांतील नागरिकांनी घरांच्या गच्चीवरून आणि शहरातील इतर उंच ठिकाणांवरून आकाशातील हा थरारक सोहळा डोळ्यांत साठवून घेतला.