
आई आणि वडिलांसाठी त्यांचे बाळ हे सर्वकाही असते. त्याच्या सुखासाठी ते सर्वकाही करतात. त्यांचा संपूर्ण जीव हा लेकरामध्ये असतो. पण नागपूरमध्ये एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एका बापाने थेट आठ वर्षांच्या मुलीवर सपासप वार करुन तिची हत्या केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. मुलीच्या आजीने हे सर्व काही डोळ्यांनी पाहिले आणि तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
नागपूरच्या वाठोडा परिसरातील सरोदेनगर येथे बुधवारी (१४ जानेवारी) पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना घडली. ८ वर्षीय चिमुकली धनश्री शेंदरेची तिच्याच वडिलांनी निर्घृण हत्या केली. ही घटना मुलीच्या ताब्यावरून पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या दीर्घकाळच्या वादातून उद्भवली आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…
वाचा: गोव्याला साजरा केला हनिमून, नंतर ऐश्वर्याला बोटीतूनच… धक्कादायक प्रकरण समोर!
नेमकं काय केलं?
धनश्री तिचे वडील शेखर शेंदरे (४६), आजी कुसुमबाई शेंदरे आणि काकांसोबत भाड्याच्या घरात राहत होती. शेखर आणि त्याची पत्नी शुभांगी यांच्यातील वैवाहिक मतभेदांमुळे दोघे वेगळे राहत होते. शुभांगी मुलीचा ताबा आपल्याकडे मिळावा, यासाठी आग्रही होती, तर शेखर याचा तीव्र विरोध करत होता. शेखर दारूच्या आहारी गेला होता आणि पत्नीवर वारंवार संशय घेऊन मारहाण करत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
बुधवारी पहाटे सुमारे ५.३० ते ५.४५ च्या सुमारास धनश्रीने पाणी मागितले. त्यानंतर रागात आणि दारूच्या नशेत असलेल्या शेखरने तणतण करत स्वयंपाकघरातील जाऊन चाकू आणला. त्यानंतर त्याने मुलीच्या छातीत सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असलेल्या धनश्रीला तातडीने आजीने जवळच्या वाठोडा पोलीस ठाण्यात नेले आणि नंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
आजीने केली तक्रार
या घटनेनंतर आजी कुसुमबाई यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी शेखर शेंदरेला तातडीने अटक केली आहे. शेखरने पोलिसांना सांगितले की, मुलीचा ताबा आईकडे जाऊ नये म्हणून त्याने हे कृत्य केले. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण नागपूर शहर आणि परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना मुलांच्या सुरक्षेसाठी आणि कौटुंबिक वादांच्या निकालासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याच्या गरजेची आठवण करून देणारी आहे.