भाजप मित्र म्हणून जवळ घेतो अन् अफझल खानासारखी मिठी मारतो; बच्चू कडू यांचा घणाघाती हल्ला

| Updated on: Oct 05, 2023 | 1:47 PM

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी वाघ नखाच्या मुद्द्यापासून ते नांदेडच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वाघ नखाच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. तर भाजपला युती धर्माची आठवण करून देत भाजपवरही जोरदार हल्ला चढवला आहे.

भाजप मित्र म्हणून जवळ घेतो अन् अफझल खानासारखी मिठी मारतो; बच्चू कडू यांचा घणाघाती हल्ला
bacchu kadu
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रमेश चोंडके, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, हिंगोली | 5 ऑक्टोबर 2023 : काल परवापर्यंत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची पाठराखण करणारे प्रहार संगघटनेचे नेते बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांनी आपल्याच सरकारवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली आहे. खासकरून बच्चू कडू यांनी भाजपवर हल्लाबोल सुरू केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बच्चू कडू आपल्याच सरकार विरोधात बोलत असल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडू धमाका घडवणार का? अशी चर्चाही या निमत्ताने आता रंगली आहे.

प्रहार संघटनेने हिंगोलीत दिव्यांग मेळाव्याचे आयोजन केलं आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी बच्चू कडू आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी भाजपला अफझल खानाची उपमा देत जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफझल खानासारखी मिठी मारतो, अशी खोचक टीका बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी थेट भाजपवरच निशाणा साधण्यास सुरुवात केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ज्यांना सोबत घेतलं त्यांच्याशी…

भाजप आमचं जाणीवपूर्वक खच्चीकरण करत आहे. बच्चू कडूला आवरा असं बावनकुळेच म्हणाले का असं मी म्हणत नाही. बावनकुळे हे स्पष्टवक्ते आहेत. त्यांच्या मनात होते, त्यावर ते बोलले. देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये सामील होण्यास सांगतात. फोन करतात आणि नंतर मात्र वेगळीच भूमिका घेतात. हे कुणासाठीही चांगलं नाही.

ज्यांच्यासोबत आपण आहोत, त्यांच्यासोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे. तुम्ही आमच्यासोबत दगाफटका करू शकता. पण लोकांसोबत करत नाही. भाजपने मित्र पक्षांना समजून घेतलं पाहिजे. नाही तर मूळ पक्षाची प्रतिमा बेकार होईल. मित्र पक्ष म्हणून जवळ घ्यायचं आणि नंतर अफझल खानासारखी मिठी मारायची हे चांगलं नाही, असा हल्लाच बच्चू कडू यांनी चढवला.

डीनचं ते काम नव्हतं का?

नांदेडमधील हॉस्पिटलच्या डीनला शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणत्याही व्यक्तीने नको तिथे जात आणू नये. जेव्हा कमजोर पडतो तेव्हा माणसाला जात आठवते. भ्रष्टाचार करताना जात आठवत नाही. पण जेव्हा अशी काही वेळ येते तेव्हा मात्र सर्वांना जात आठवते. जो काही प्रकार रुग्णालयात झाला असेल तो योग्य नसेलही. पण रुग्णालयात अस्वच्छता नव्हती. ते पाहण्याचं काम डीनचं नव्हतं का? असा सवाल करत बच्चू कडू यांनी खासदार हेमंत पाटील यांचं समर्थन केलं.

आधी स्वत:ची वाघ नखे बघा

वाघ नखांच्या मुद्द्यावरूनही बच्चू कडू यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. वाघ नखे हा काय मुद्दा आहे काय? ज्यांना नखे राहिली नाही, त्यांनी त्यावर बोलावं हे आश्चर्य आहे. आधी स्वत:ला किती नखं राहिली ते पाहावं, असा टोला बच्चू कडू यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.