Nagpur Agrovision | शेती करा इस्त्राइलसारखी, केंद्रीय मंत्री गडकरींचं आवाहन

| Updated on: Dec 12, 2021 | 4:11 PM

आयुर्वेदिक औषधे, मासेमारी अशा सर्वांबाबतची माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळावे. संशोधन, बाजारपेठेची स्थिती शेतकर्‍यांना कळली ते शेतकरी यशस्वी होतील. अनेक क्षेत्रात नवीन संशोधन सुरू आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

Nagpur Agrovision | शेती करा इस्त्राइलसारखी, केंद्रीय मंत्री गडकरींचं आवाहन
अॅग्रोव्हिजन रेडिओचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. विकास महात्मे व इतर.
Follow us on

नागपूर : विदर्भातील शेतकरी समृद्ध, संपन्न व शक्तिशाली व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. यासाठी इस्रायलच्या शेतीसारखी शेती करा. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असं आवाहन गडकरी यांनी केलं. अॅग्रोव्हिजन रेडिओचे शनिवारी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला खा. डॉ. विकास महात्मे, खा. रामदास तडस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावरकर, विकास कुंभारे, आशिष जयस्वाल, प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार अनिल बोंडे, गिरीश गांधी, अॅग्रोव्हिजनचे आयोजक सचिव रवी बोरटकर, सचिव रमेश मानकर, सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी आदी उपस्थित होते.

बाजारपेठेची स्थिती शेतकऱ्यांना कळावी

गडकरी म्हणाले, विदर्भातील शेतकरी कुठेच कमी राहणार नाही. शेतकर्‍याला नफा झाला, तर मला आनंद होतो. मात्र, नफा होणार्‍या शेतकर्‍यांचा आकडा शेकड्यांत आहे, तो हजारांत जावा. अॅग्रीकल्चर एक्स्पोर्ट इन विदर्भा हा विषय अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात राहणार आहे. अॅग्रोव्हिजन ही एक चळवळ व्हावी व हजारो शेतकरी या चळवळीशी जोडले जावे. आयुर्वेदिक औषधे, मासेमारी अशा सर्वांबाबतची माहिती व तंत्रज्ञान, संशोधन, बाजारपेठेची स्थिती शेतकर्‍यांना कळली ते शेतकरी यशस्वी होतील. अनेक क्षेत्रात नवीन संशोधन सुरू आहे.

राजेश बगल यांचा सत्कार

सावनेर तालुक्यातील शेतकरी राजेश बगल यांनी विदर्भात प्रथमच उसाचे शंभर टनावर घेतले. त्याबद्दल त्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावर्षी विदर्भातील संत्रा रेल्वेने बांगलादेशला निर्यात केला. त्यासाठी रेल्वेभाड्यात संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना सबसिडीही मिळवून दिली. यापूर्वी संत्र्यांवर ग्रेडिंग करणारे कारखाने आपल्याकडे नव्हते. पण, आता 13 कारखाने झाले आहेत. आता काटोल, नरखेड, वरूड, मोर्शी येथूनही संत्र्यांसाठी तसेच आकोटवरून केळी निर्यात करण्यासाठी रेल्वे सुरू करण्यात येईल.

विदर्भातील झिंगे दुबईला पाठविणार

विदर्भातील गोड्या पाण्यातील झिंगे खूप प्रसिद्ध आहे. हे झिंगे सिंगापूर आणि दुबई येथे व जगात पाठविण्याचे प्रयत्न आहे. नागपुरात अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या निर्यात होऊ शकतात. पण, उत्पादनात मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे. पिकांवर ड्रोनने फवारणी करून उत्पन्न दुपटीने वाढणार आहे. पंजाबमध्ये आता मेकॅनाईज्ड शेती झाली आहे, त्याचा विचार करावा लागणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

Flowers Exhibition | नागपुरात रंगीबेरंगी फुलांची बाग फुलली!

Nagpur | चिंता भविष्याची! महापौरांनी घेतला विद्यार्थी-पालकांचा क्लास; कसे घडणार सुपर 75?