Nagpur | चिंता भविष्याची! महापौरांनी घेतला विद्यार्थी-पालकांचा क्लास; कसे घडणार सुपर 75?

Nagpur | चिंता भविष्याची! महापौरांनी घेतला विद्यार्थी-पालकांचा क्लास; कसे घडणार सुपर 75?
महापौर दयाशंकर तिवारी चर्चा करताना.

भविष्यात मनपाच्या शाळेतील 75 विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासह देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज होतील. पुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असून मनपाचे विद्यार्थी आपले नाव लौकिक करतील, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 12, 2021 | 12:05 PM

नागपूर : मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी सुपर 75 हा उपक्रम सुरू करण्यात आला.
आयआयटी, नीट यासारख्या कठीण परीक्षेत मनपा शाळेत शिकणारे विद्यार्थी टिकावेत. यासाठी महापौरांची धडपड सुरू आहे. या कठीण परीक्षांसाठी मनपाच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जात आहे. महापौरांनी विद्यार्थी-पालकांचा क्लास घेत त्यांना यासाठी प्रवृत्त केले.

महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतील मनपा शाळेतील सुपर-75 विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. फुले मार्केट येथील नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेत सुरू असलेल्या सुपर-75 वर्गांना महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी भेट दिली. भेटीदरम्यान महापौरांनी विद्यार्थ्यांशी तसेच त्यांच्या पालकांशी चर्चा केली. यावेळी मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर, असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे सचिव जयंत गणवीर, मनीष वाजपेयी, नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका साधना सयाम तसेच पालक उपस्थित होते.

स्वप्न पूर्तीसाठी अडथळे नकोत

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की, नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी ते पुढे जाऊ शकत नाही. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपले विद्यार्थी अंतरीक्षातही झेप घेण्याची जिद्द ठेवतात हे यापूर्वीही दाखवून दिले आहे. या अशा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना भविष्यात केवळ परिस्थितीमुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यात अडथळे येऊ नयेत. यासाठी नागपूर महापालिकेने सुपर-75 चा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात मनपाच्या शाळेतील 75 विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासह देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज होतील. पुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असून मनपाचे विद्यार्थी आपले नाव लौकिक करतील, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला.

35 मुली आणि 40 मुलांचा समावेश

पुढे म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांसाठी नेताजी मार्केट हिंदी शाळा दूर आहे आशा विद्यार्थ्यांना आणण्यासाठी व्यवस्था करावी आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही समुपदेशन करण्यासाठी एक वर्ग घेण्यात यावा, अशी सूचना मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर यांना यावेळी केली. यामुळे पालक आपल्या घरी मुलांचा अभ्यास बद्दल माहिती घेऊ शकतील. त्यांच्या मनातील शंका दूर होऊन पाल्यांना ते उचित मार्गदर्शन करू शकतील, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे आभार मानले. सुपर-75 मध्ये मनपाच्या विविध शाळेतील निवडक 35 मुली आणि 40 मुलांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शन करण्यात येत आहे. हे वर्ग प्रत्येक शनिवार आणि रविवारी घेतल्या जातात.

आयआयटी, आणि नीटसाठी तयारी

असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे सचिव जयंत गणवीर म्हणाले, महापौरांनी सुपर-७५ ची आपली संकल्पना विषद केली. असोसिएशनद्वारे महापौरांच्या सूचनेला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन 75 जणांची निवड करण्यात आली. नागपूर शहरात असोसिएशनच्या माध्यमातून सुमारे 100च्या वर कोचिंग क्लासेस आणि दोन हजार शिक्षक जुळलेले आहेत. या सर्वांच्या सहकार्याने या सुपर-75 विद्यार्थ्यांना त्याच दर्जेदार शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण देण्यात येणार आहे. मनपाच्या माध्यमातून असोसिएशनला ही संधी मिळाली आहे. असोसिएशनद्वारे आयआयटी, आणि नीट परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना संपूर्ण सक्षम बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही जयंत गणवीर यांनी यावेळी दिली.

Nagpur| लोकअदालत! सामंजस्याने 11 हजार 582 खटले निकाली; कसा झाला निपटारा?

Nagpur Jobs | घरबसल्या शोधा रोजगार! बेरोजगारांसाठी ऑनलाईन मेळावा आजपासून

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें