Weather Update : आता राज्यावर अल निनोचं नवं संकट! ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी उच्चांकी… टेन्शन वाढलं
अल निनोमुळे महाराष्ट्रात यंदा अत्यंत कमी पाऊस झाला असून, 75% राज्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. आता अल निनोचे नवे संकट उभे ठाकले आहे. तापमानात विक्रमी वाढ. अमरावती, नंदुरबार, संभाजीनगर येथे ऑक्टोबर हीटचा अनुभव येत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरचे तापमान विक्रम मोडले आहेत.

अखेर पावसाळा संपला असून अल निनोमुळे यंदा राज्यात पाऊस अत्यंत कमी पडला. दशकातील सर्वात कमी पावसाची नोंद राज्यात झाली आहे. इतकेच नव्हे, तर मराठवाड्यात तर 1972 च्या दुष्काळापेक्षाही भयानक दुष्काळ पडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात 75 टक्के दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, शेतकरी आणि सामान्य जनतेवरील टेन्शन काही संपलेलं नाही. अल निनोमुळे आता आणखी दुसरं संकट दारात येऊन उभं ठाकलं आहे. अल निनोमुळे येत्या काळात राज्यातील तापमान वाढण्याचे संकेत मिळत आहेत. कालपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यात कडाक्याचं ऊन पडलं असून नागरिक होरपळून निघाले आहेत.
अमरावतीचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी मीडियाशी संवाद साधताना या संकटाचा अंदाज सांगितला. अलनिनोमुळे अमरावतीत तापमानाने सप्टेंबर महिन्यातील 18 वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. अमरावतीचं तापमान 36 अंशाच्या वर गेले होते. सकाळपासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसत आहेत. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात तापमान 32 ते 34 अंशापर्यंत जाते. यावर्षी मात्र पहिल्यांदाच अमरावतीचे तापमान 36 अंशावर गेले आहे, अशी माहिती अनिल बंड यांनी दिली.
5 ऑक्टोबर नंतर पाऊस
5 ऑक्टोबर नंतर विदर्भात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे, असा अंदाजही बंड यांनी वर्तवला आहे. अमरावतीत अचानक तापमान वाढल्याने अमरावतीकर घराबाहेर पडताना विशेष काळजी घेत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
नंदूरबारला मोठा तडाखा
दरम्यान, ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी नंदुरबार जिल्ह्याला उन्हाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पावसाची कमतरता आणि वातावरणातील बदलामुळे उष्णतेची तीव्रता वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये थंडीची चाहूल लागण्याऐवजी नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तीव्र सूर्यकिरणांमुळे खरीप हंगामातील पिकांवरही परिणाम होत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांसह शेतकरीही त्रस्त झाले आहेत. नंदूरबार-गुजरात महामार्गावरील वाहतुकीवरही उन्हाचा परिणाम जाणवत आहे. येत्या काही दिवसांत तापमानाची तीव्रता आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
संभाजीनगरमध्ये 39 वर्षांतील सर्वाधिक नोंद
सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी शहरात 39 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी शहराचा कमाल पारा तब्बल 36.9 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. यापूर्वी 26 सप्टेंबर 1987 रोजी 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हा उच्चांकी पारा ठरला आहे. विशेष म्हणजे, या महिन्यातील 30 पैकी 26 दिवस कमाल तापमान 30 अंशांपेक्षा अधिक राहिलं आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात सातत्याने वाढ झाली आणि आता ऑक्टोबर सुरू होताच हिटची चाहूल लागली आहे. यंदाच्या एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनमध्ये शहराला उन्हाचा फटका बसला असून, पावसाची उघडीप आणि हवेत घटलेली आर्द्रता यामुळे ऑक्टोबर हिटचा अनुभव नागरिकांना येत आहे.