धाकधूक वाढली… लाडकी बहीण योजना बंद होणार? झिरवाळ यांच्या विधानानंतर बावनकुळे थेटच म्हणाले…

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या लाडकी बहीण योजनेवरील विधानामुळे योजना बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र महसूल मंत्री बावनकुळे यांनी ही योजना मजबूत करण्याचे आश्वासन दिले आहे. दुष्काळ आणि योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण येत असला तरी, योजना बंद होणार नाही असे स्पष्ट केले आहे. इतर मंत्र्यांनीही झिरवाळ यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.

धाकधूक वाढली... लाडकी बहीण योजना बंद होणार? झिरवाळ यांच्या विधानानंतर बावनकुळे थेटच म्हणाले...
chandrashekhar bawankule
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 2:00 PM

राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाडकी बहीण योजनेवरून मोठं विधान केलं आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याच्या भीतीने लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली आहे. धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय, अशी अवस्था लाडकी बहीण योजनेमुळे झाली आहे. या योजनेमुळे सद्याच्या परिस्थितीत सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे, अशी कबुलीच नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. त्यामुळे ही योजना बंद पडणार की काय? अशी चर्चा रंगली आहे. झिरवाळ यांच्या विधानावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही थेटच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झिरवाळ यांच्या विधानावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. काही काळ असा ताण येतो. पण राज्य सरकार ताण निवळण्यासाठी सक्षम आहे. यावर्षी दुष्काळ आहे, पुढच्या वर्षी त्यातून मार्ग काढू. पण लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही. त्या योजनेला अधिक मजबूत करण्याचं काम आमचं सरकार करेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Loading...

बोलणं टाळलं असतं तर…

झिरवाळ यांच्या विधानावर राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. झिरवाळ यांनी लाडक्या बहिणींबाबत असं बोलणं टाळलं असतं तर बरं झालं असतं. लाडक्या बहिणीने आपल्याला सत्तेवर आणलेलं आहे. लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत. मात्र ते सुद्धा मिळून जातील, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

ते त्यांचं वैयक्तिक मत

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ते झिरवाळ यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे. झिरवाळ यांचं ते वैयक्तिक मत असावं. मात्र यामुळे अनेक बहिणी कामाला लागल्या आहेत. एखादा विकास काम कमी झाला असावा, पण या योजनेचा आधार महिलाना मिळत आहेत, ही योजना बंद होणार नाही, असं शिरसाट म्हणाले.

काय म्हणाले होते झिरवाळ?

लाडकी बहीण योजना आणि दुष्काळ यामुळे सरकारची मोठी आर्थिक कसरत सुरू असल्याची कबुली खुद्द अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली होती. निवडणुकीपूर्वी आमच्या सरकारला ही योजना सुरू करण्यासाठी कोणी सांगितलं नव्हतं. तरीही आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली, आता धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशी अवस्था झाली आहे. आता त्यांना बाजूलाही करू शकत नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे आणि त्यात हा दुष्काळ आलाय, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथे दोन दिवसापूर्वी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 1972 मध्ये अन्नाचा दुष्काळ होता. मात्र आज अन्नाची टंचाई नाही. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे किंवा विमानाने पाणी पोहोचवण्यासारख्या उपाययोजना कराव्या लागल्यास मोठा निधी लागेल आणि त्यामुळे यंदा तसंच पुढच्या वर्षीही काहीशी आर्थिक चणचण भासू शकते, असं मत झिरवाळ यांनी व्यक्त केलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us