Nagpur | मनपा शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट; शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

| Updated on: Dec 17, 2021 | 10:52 AM

नागपूर शहरातील इयत्ता पहिली ते सातवी वर्ग असलेल्या मनपाच्या 116 शाळांसह 1053 खासगी शाळा अशा एकूण 1069 शाळा गुरूवारी सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पहिल्या दिवशी सुरु झालेल्या सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

Nagpur | मनपा शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट; शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
manapa school
Follow us on

नागपूर : सुमारे दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर गुरुवारी नागपूर शहरातील प्राथमिक शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकू आला. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर पहिल्यांदाच नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा गुरूवारी सुरू झाल्या. मनपाच्या विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने व शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

1069 शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट

नागपूर शहरातील इयत्ता पहिली ते सातवी वर्ग असलेल्या मनपाच्या 116 शाळांसह 1053 खासगी शाळा अशा एकूण 1069 शाळा गुरूवारी सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पहिल्या दिवशी सुरु झालेल्या सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे विशेष लक्ष देत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. मनपाच्या विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेसह सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनींग करण्यात आली. मास्क लावण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना हात धुणे, सॅनिटायजरचा वापर आणि कोव्हिड संदर्भातील सुरक्षेची माहिती देण्यात आली. वर्गखोल्यांमध्येही सुरक्षेची काळजी घेण्यात आल्याचे दिसून आले. एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.

विकासात मदत होणार – सभापती प्रा. दिवे

यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करीत त्यांच्याशी संवाद साधला. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देण्यात येत होते. मध्यंतरी माध्यमिक शाळेचे वर्ग सुरू झाले. मात्र प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत कुठलेही आदेश नसल्याने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन माध्यमातूनच सुरू होते. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आता कुठल्याही अडथळ्याविना शिक्षण घेणे शक्य झाले आहे. शाळा परिसरात, वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी संपूर्ण सुरक्षा पाळण्याची शिस्त विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून लावण्यात येत आहे.

शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर यांनी दिल्या सूचना

मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी यावेळी शाळांमध्ये शिक्षकांना आवश्यक सूचना केल्या. तसेच विद्यार्थ्यांसोबतही संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार मनपा क्षेत्रातील सर्व शाळांना कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. विद्यार्थी किंवा शिक्षकात कोव्हिड संदर्भात लक्षणे दिसून आल्यास त्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास शाळा बंद करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करणे आदी सर्व सूचना शाळांना देण्यात आलेल्या आहेत.

Nagpur Crime | 1 कोटी रुपयांची प्रतिबंधित सुपारी जप्त, ट्रान्सपोर्ट प्लाझा येथे गुन्हे शाखेनं टाकला छापा

Science Fair | अपूर्व विज्ञान मेळावा : नागपुरातल्या छोट्या वैज्ञानिकांची मोठी गोष्ट!