मोठी बातमी ! शेतकऱ्यांना लगेच मदत मिळणार नाही… चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळणार नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केले की, पूर्ण अहवाल आणि अचूक पंचनामे झाल्याशिवाय मदत दिली जाणार नाही, जेणेकरून कोणाचेही नुकसान होऊ नये. दर मंगळवारी उपसमिती आढावा घेईल.

राज्य सरकारने राज्यात 75 टक्के दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ निवारणासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमितीही स्थापन केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर आर्थिक मदत मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना लगेच मदत मिळणार नाही, असं मोठं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. संपूर्ण रिपोर्ट आल्यावरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे यवतमाळमध्ये आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी थेटच प्रतिक्रिया दिली. दुष्काळी मदतीतून एकही शेतकरी सुटणार नाही असा आमचा प्रयत्न सुरू आहे. पंचनामे करताना त्या भागातील परिस्थिती विचारात घेऊन राज्याचं सरासरी नुकसान काय आहे हे पाहून आपण मदत करतो. शेवटी आजच्या आज मदत जाहीर होणार नाही. पिकांचे पंचनामे होऊ द्यावे लागतील, परिस्थिती काय आहे हे पाहावे लागेल, तूरला काय मदत केली पाहिजे, कापसाला काय मदत केली पाहिजे, सोयाबीनला काय मदत केली पाहिजे, हळदीला काय मदत केली पाहिजे, बागायतदारांना काय मदत केली पाहिजे, संत्र्यासाठी काय मदत केली पाहिजे… याचे वेगवेगळे पॅरामीटर आहेत. कुणी तरी म्हणालं, आजच्या आज मदत जाहीर करून टाका. म्हटलं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर? त्यामुळे संपूर्ण रिपोर्ट आले पाहिजे. ही भूमिका आहे. पंचनाम्याच्या आधारे मदत केली जाते. मुख्यमंत्री लवकर मदत जाहीर करतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
प्रत्येक मंगळवारी आढावा
एनडीआरएफच्या मदतीसाठी पंचनामे अचूक होणे महत्त्वाचे आहेत. पंचनामे अचूक झाले तर शेतकऱ्यांना योग्य मदत मिळते. मंत्रिमंडळ उपसमितीला दुष्काळी स्थितीचे अचूनक विवरण करायचे आहे. प्रत्येक मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. यावेळी दुष्काळी स्थितीचा आढावा घेऊ, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
दुष्काळाचं राजकारण नकोच
विरोधकांनी केलेलं दुष्काळाच राजकारण चुकीच आहे. शेतकरी शेतमजुरांवर दुष्काळ आहे. सर्वांनी एकत्र येऊन दुष्काळाच्या झळा समजल्या पाहिजे. आपापल्या परिने सहायता निधीत मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांचा पहिला हक्क सरकारवर आहे. अचूक पंचनामे व्हावे यासाठी. माझा दौरा सुरू आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
12 तास वीज देणार
शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्याबाबतचे स्पष्ट आदेश महावितरणला देण्यात आले आहेत. वीज मिळाल्यास पर्याप्त पाणी साठ्यातून शेतकरी सिंचन करू शकतात. वीज मिळत नसेल तर त्यावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
पवारांनी पत्र दिलं म्हणून…
दुष्काळाबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्र देणं हे विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम आहे. पवारांनी पत्र दिलंय म्हणून आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय असं नाही. अनेक आमदारांनी तशी पत्र दिली आहेत. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनीही पत्र दिली आहेत. 2000 वर अधिक पत्र आली आहेत. स्वत: मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यांनी निर्णय घेतला आहे. दुष्काळाच्या यादीतून जे तालुके सुटले आहेत, त्याचा अभ्यास करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एसआयआर करण्यात चूक काय?
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मोर्चावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. काही लोकांना फक्त राजकारण करायचं आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. आधी ईव्हीएमवर शंका घेतली होती. आता एसआयआरचा मुद्दा काढला आहे. एसआयआर करण्यात काय चूक आहे? विरोधक खोटारडे आहेत. बुथवर काम करत नाहीत. बुथलेव्हलवर फिरत नाहीत. फक्त शंका घेतात आणि आरोप करतात. ही बोगसगिरी आहे. यांचे डोके खराब झालं आहे. निगेटिव्हिटी तयार करून निवडणुका जिंकण्याचा यांचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीने मतदान मिळत नसतं. लोकसभा निवडणुकीवेळी संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार केला. खोटारडेपणा केला. आता लोकांना हे समजलं म्हणूनच विधानसभेत भाजपला 51 टक्के मतदान मिळालं. काँग्रेस पार्टी आता घरी बसली आहे. या देशात खरेपणाच चालणार, खोटेपणा चालणार नाही, असंही ते म्हणाले.