14 मार्चला राज्यात मोठा राजकीय भूकंप, मोठे पक्ष प्रवेश होणार, बावनकुळे यांचा मोठा दावा; कोणत्या पक्षाला बसणार हादरा?

| Updated on: Mar 10, 2023 | 1:06 PM

कसब्याच्या गेल्या चार निवडणुकीत आम्हाला जेवढी मते मिळाली होती. तेवढीच मते यावेळीही मिळाली आहेत. विजयासाठी चार टक्के मते कमी पडली आहेत. आम्ही आमची ताकद वाढवत आहोत.

14 मार्चला राज्यात मोठा राजकीय भूकंप, मोठे पक्ष प्रवेश होणार, बावनकुळे यांचा मोठा दावा; कोणत्या पक्षाला बसणार हादरा?
chandrashekhar bawankule
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : येत्या 14 मार्चला सरकार कोसळणार आहे. हे माहीत झाल्यामुळेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून केवळ घोषणांचा पाऊस पाडला. आपण पुन्हा सत्तेत येणार नाही याची जाणीव झाल्यानेच सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. विरोधकांच्या या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला आहे. येत्या 14 मार्च रोजी सरकार कोसळणार नाही. तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे, असं मोठं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता राज्यातील कोणता पक्ष फुटणार? अशी चर्चा या निमित्ताने केली जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. येत्या 14 मार्च रोजी मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत. पक्ष प्रवेशाचे मोठे भूकंप राज्यात बसणार आहेत. आमचे सरकार म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात नाही. आम्ही तोंडाच्या वाफा काढत नाही, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच दैनिक सामनाच्या अग्रलेखातून अर्थसंकल्पावर टीका करण्यात आली आहे. त्यावरही त्यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सामनाला अर्थसंकल्प कळतो का? सामनामध्ये लिहिणाऱ्यांनी कधी निवडणुका लढवल्या आहेत काय? असा संतप्त सवाल बावनकुळे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

राऊतांना करारा जवाब

चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचं अध्यक्षपद स्वीकारल्यापासून भाजपला अनेक निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी आत्मचिंतन करावं, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. त्यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच त्यांच्या नेतृत्वात कोणत्या कोणत्या निवडणुका जिंकल्या त्याचा आकडाच सांगितला. त्यांचे सरकार गेलंय, आमचं सरकार येऊन सहा महिने झाले आहेत. मी अध्यक्ष झाल्यावर 7731 ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. भाजपचे 3003 सरपंच निवडून आले. कसबा निकालानंतर त्यांच्या पोटात बॅाम्ब तयार झालाय. तो बॅाम्ब त्यांना झोपू देत नाही, असा हल्ला त्यांनी चढवला.

तेव्हा राऊतच अभिनंदन करतील

कसब्याच्या गेल्या चार निवडणुकीत आम्हाला जेवढी मते मिळाली होती. तेवढीच मते यावेळीही मिळाली आहेत. विजयासाठी चार टक्के मते कमी पडली आहेत. आम्ही आमची ताकद वाढवत आहोत. 2024 मध्ये स्वत: संजय राऊत हे आमचं अभिनंदन करतील, असं सांगतानाच पक्ष वाढवण्यासाठी त्यांना बोलावं लागतंय. ठाकरे गटाकडचे आमदार जातील म्हणून ते असं बोलत आहे. 14 तारखेला पक्ष प्रवेश आहे. तेव्हा कळेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांना मदत देणार

शिंदे -फडणवीस सरकारने गेल्या सरकारपेक्षा दीड पट मदत शेतकऱ्यांना केली आहे. केंद्राची वाट बघितली नाही. गेल्या सरकारमध्ये तोंडाच्या वाफा, बोलाचा भात, बोलाची कढी होती. शेतकऱ्यांना तेव्हाची मदत अजूनही मिळाली नाही. शिंदे – फडणवीस सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेय. हे अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.