बायोडिझेल साठ्यावर पोलिसांची धाड, नांद्यात अघीन ट्रान्सपोर्टच्या आवारात हेराफेरी

| Updated on: Nov 25, 2021 | 10:41 AM

पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी अघीन ट्रान्सपोर्टच्या आवारातील उभ्या टँकरमधील कथित बायोडिझेलचे नमुने घेतले. दोन्ही वाहनातील 3500 लिटर कथित बायोडिझेल जप्त केले. नमुने पोलिसांच्या वतीने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.

बायोडिझेल साठ्यावर पोलिसांची धाड, नांद्यात अघीन ट्रान्सपोर्टच्या आवारात हेराफेरी
चंद्रपूर : अघीन ट्रान्सपोर्टच्या आवारात बायोडिझेल साठ्यावर धाड टाकताना पोलीस.
Follow us on

चंद्रपूर : पोलिसांनी जिल्ह्यातील आवारपूर परिसरात कथित बायोडिझेल साठ्यावर धाड घातली. नांदा परिसरातील अघीन ट्रान्सपोर्टच्या आवारात अगदी उघडपणे कथित बायोडिझेलची हेराफेरी सुरू होती. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी अघीन ट्रान्सपोर्टच्या आवारातील उभ्या टँकरमधील कथित बायोडिझेलचे नमुने घेतले आहेत. दोन्ही वाहनांतील 3500 लिटर कथित बायोडिझेल जप्त केले आहे. कुठलाही वैध परवाना नसताना ज्वलनशील द्रवाच्या टँकरची खुलेआम वाहतूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील आवारपूर म्हणजे सिमेंट उद्योगाचा परिसर. याच भागात पोलिसांनी कथित बायोडिझेल साठ्यावर धाड घातल्याने खळबळ उडाली आहे. नांदा परिसरातील अघीन ट्रान्सपोर्टच्या आवारात कथित बायोडिझेलची हेराफेरी अगदी उघडपणे सुरू होती. या ट्रान्सपोर्ट कंपनीकडे सिमेंट उद्योगातील कच्चा माल ने-आण करण्यासाठी 100 हून अधिक महाकाय बल्कर आहेत. या बल्करसाठी लागणारा डिझेलवरील कोट्यवधींचा खर्च वाचविण्यासाठी बायोडिझेलची शक्कल लढविली गेली.

बायोडिझेलचे नमुने घेतले

जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावर 100 किमी अंतरावर असलेल्या वरोरा या ठिकाणाहून बायोडिझेलच्या खोटारड्या संशोधक-निर्मात्यांनी कुठलाही वैध परवाना नसलेल्या एका छोट्या टँकरमधून ही धोकादायक वाहतूक चालविली होती. वरोरा येथून एका विशिष्ट डिझेल पंपावरून भेसळ असलेले हे इंधन छोट्या टँकरमध्ये भरायचे आणि ते वाहतूकदारांना त्यांच्या थेट डेपोत वितरित करायचे असा हा गोरखधंदा सुरू होता. मुख्य म्हणजे या अघीन कंपनीच्या आवारात चक्क BPCL कंपनीचा 6 हजार लिटर क्षमतेचा एक स्थायी अवैध टँकर स्वतंत्रपणे ठेवला गेला होता. जणू कंपनीने पेट्रोल पंप उभा करावा अशी ही स्थिती होती. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी अघीन ट्रान्सपोर्टच्या आवारातील उभ्या टँकरमधील कथित बायोडिझेलचे नमुने घेतले आहेत, अशी माहिती कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी दिली.

वाहतूकदारांवर कठोर कारवाई गरजेची

दोन्ही वाहनातील 3500 लिटर कथित बायोडिझेल जप्त करण्यात आले आहे. चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नमुने पोलिसांच्या वतीने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात कुठलाही वैध परवाना नसताना ज्वलनशील टँकरची खुलेआम वाहतूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून औद्योगिक जिल्ह्यात घातक प्रदूषणासाठी जबाबदार कथित बायोडिझेल निर्माते आणि वाहतूकदारांवर कठोर कारवाई गरजेची झाली असल्याचं गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी सांगितले.

चंद्रपुरात हनी ट्रॅपमध्ये अडकला वकील, व्हाट्सअप व्हिडीओच्या माध्यमातून तरुणीने संवादात अडकवले

दुर्गापूरच्या ग्रामपंचायतीमध्ये राडा, गावकऱ्यांनी दारू दुकानाला परवानगी नाकारली