ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य कालवश, भाजप नेत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार

| Updated on: Dec 20, 2020 | 7:23 AM

मा. गो. वैद्य यांचे 19 डिसेंबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झालं.

ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य कालवश, भाजप नेत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार
Follow us on

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य (माधव गोविंद वैद्य) (Ma Go Vaidya) यांच्या पार्थिवावर आज (20 डिसेंबर 2020) अंत्यसंस्कार होणार आहेत. नागपुरातील अंबाझरी घाटावर सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. संघासह भाजपचे अनेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. वयाच्या 97 व्या वर्षी मा. गो. वैद्य यांनी नागपुरात अखेरचा श्वास घेतला. मागोंच्या निधनाने संघ परिवारात दुःखाची लहर पसरली आहे. (RSS Former spokesperson Ma Go Vaidya Funeral)

मा. गो. वैद्य यांचे काल (19 डिसेंबर 2020) दुपारी तीन वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झालं. नागपूरच्या प्रतापनगर भागातील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास निघेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रात्री उशिरा त्यांचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन मागोंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता.

मा. गो. वैद्य यांनी संघाचे विचार आपल्या जीवनात पूर्णतः उतरवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते माजी प्रवक्ते होते. तर तरुण भारत या दैनिकाचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी भूमिका पार पडल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील तरोडा हे मा. गो. वैद्य यांचं मूळगाव होतं. मा. गो. वैद्य यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, मुली विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, मुले धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण आणि डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

मा. गो. वैद्य यांचा परिचय

मा. गो. वैद्य यांनी 1966 पासून अनेक वर्षे पत्रकारिता केली. अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणार्‍या वैद्य यांना पत्रकारिता आणि समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 पासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. 1948 मध्ये गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ’सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक मा. गो. वैद्य यांनी लिहिले. 1978 साली मा. गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यावेळची त्यांची कारकीर्दही उल्लेखनीय राहिली.

नितीन गडकरी भावूक

बाबूरावजी शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती, अशी श्रद्धांजली नितीन गडकरींनी व्यक्त केली. (RSS Former spokesperson Ma Go Vaidya Funeral)

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली

मा. गो. वैद्य हे अलौकिक लेखक आणि पत्रकार होते. संघासाठी त्यांनी दशकानुदशकं योगदान दिलं. भाजपच्या मजबुतीकरणासाठी त्यांनी मोठं कार्य केलं. त्यांच्या निधनाने अतीव दुःख झालं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन

(RSS Former spokesperson Ma Go Vaidya Funeral)