शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसणार, तीन आमदार देणार सोडचिठ्ठी; धर्मरावबाबा आत्राम यांचा मोठा दावा

| Updated on: Aug 23, 2023 | 12:18 PM

शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटातील तीन आमदार अजितदादा गटाच्या वाटेवर आहेत. या तिन्ही आमदारांचा कधीही अजितदादा गटात प्रवेश होऊ शकतो, अशी माहितीच खुद्द मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे.

शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसणार, तीन आमदार देणार सोडचिठ्ठी; धर्मरावबाबा आत्राम यांचा मोठा दावा
dharmarao baba atram
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर | 23 ऑगस्ट 2023 : अजित पवार यांनी 40 आमदारांसह राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीमधील पडझड थांबल्याचं बोललं जात आहे. पण राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी एक दावा करून शरद पवार गटाच्या तंबूत खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार गटाचे आणखी तीन आमदार आमच्याकडे येणार आहेत. लवकरच या तिघांचा प्रवेश होणार आहे, असा दावा धर्मरावबाब यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार गटाला धक्का देणारे ते तीन आमदार कोण? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे अजितदादा गटात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तशी जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम यांना विचारलं असता त्यांनी थेट मोठी माहितीच दिली. शरद पवार गटाचे आणखी तीन आमदार हे अजितदादा गटात येणार आहेत. सध्या आम्हाला 45 आमदारांचं समर्थन आहे. त्यात तीन आमदार वाढून 48 होणार आहे. तीन आमदार नक्की येणार आहेत. पण त्यांची नावं मी सांगत नाही. पण येणार आहेत हे नक्की. विकासासाठी आमदार आमच्याकडे येत आहेत. विकास कामासाठी निधी मिळत आहे, असा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

गडचिरोलीतून लढणार

आजपासून राष्ट्रवादीच्या पक्षबांधणीसाठी मंत्र्यांचे दौरे सुरु झाले आहेत. अजित पवार गटाची निवडणुकीची तयारी आजपासून सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आत्रामही कामाला लागले आहेत. संघटन बांधणी, सदस्य नोंदणी, नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम हे आज यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दौऱ्यावर आले आहेत.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठीचा हा दौरा आहे. यावेळी धर्मरावबाबा यांनी आपली लोकसभेची उमेदवारीच घोषित केली. मी गडचिरोलीतून लोकसभेची निवडणूक लढणार आहे. त्याचीच तयारी सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.

जिंकण्याची शक्यता तिथेच…

निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या आमच्या पक्षांची बांधणी करणं गरजेचं आहे. ज्या भागात आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात तिथेच आमची चाचपणी सुरू आहे. निवडणुका जवळ आल्यात. वेळ कमी आहे. त्यामुळे आम्हाला ही स्ट्रॅटेजी वापरावी लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

रोहित पवार काय म्हणाले?

राजेश टोपे हे अजितदादा गटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजेश टोपे अजित पवार गटाकडे जाणार ही फक्त चर्चा आहे. दोन महिने उशिरा ते भूमिका का घेत आहेत? त्यांनी तशी भूमिका घेतली तर त्यांची ती राजकीय आत्महत्या असेल, असं रोहित पवार म्हणाले.